
पोटाची खळगी भरण्यासाठी परगावात स्थलांतरित झालेले मजूर पावसाची चाहूल लागताच पुन्हा वाड्या-पाड्यांवर परतू लागले आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील ठाकूर-कातकरी पाडे पुन्हा गजबजून गेले आहेत. पावसापासून संरक्षण करण्यासाठी जुन्या मोडकळीस आलेल्या झोपड्यांची डागडुजी करण्याची लगबग सुरू झाली आहे. बांबू रोवून त्यावर प्लास्टिकची ताडपत्री आणि गवत शाकारणी सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागल्याने ओस पडलेल्या पाड्यांवर जिवंतपणा जाणवू लागला आहे.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाड्यांना पैसा कायद्याखाली सुविधा सरकारने जाहीर केल्या असल्या तरी त्या कागदावरच आहेत. रोजगार हमी योजनेच्या नावाने बोंब आहे. त्यामुळे येथील आदिवासींना पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. थंडीचा मोसम सुरू झाला की तालुक्यातील पाडेच्या पाडे स्थलांतरित होऊन ओस पडतात. दुसऱ्या शहरात वीटभट्ट्यांवर मोलमजुरी करणे, ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करणे यातून हे आदिवासी दोन पैसे गाठीला बांधतात.
आठवडा बाजारात गर्दी
हजारोंच्या संख्येने स्थलांतरित झालेले हे मजूर पावसाची चाहूल लागताच गाव-पाड्यात परतल्याने गाव-पाडे गजबजले आहेत. दोन पैसे खिशात खुळखुळत असल्याने या आदिवासी मजुरांच्या गर्दीने शहापूर, किन्हवली, सरळगावचे आठवडा बाजार गजबजून जात आहेत. सुकेट, वाकट्या, बोंबील यासारखी मासळी, मीठ, हळद, मसाला, तांदूळ कणी अशा जिन्नसांची जोरदार खरेदी होऊ लागली आहे. घरावर घालण्यासाठी ताडपत्री व पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य याला मोठी मागणी आहे. त्यामुळे सध्या आठवडा बाजाराला तेजी आली आहे.
“शिक्षण नाही, वाड्या-पाड्यांवर रस्ते नाहीत, उन्हाळ्यात पाण्याची बोंब, पावसाळ्यात रस्त्याअभावी संपर्क तुटतो, आमच्या वाट्याला कायमच उपेक्षा आहे,” अशी खंत ओंजिवले गावचे माजी सरपंच किसन मुकणे यांनी व्यक्त केली.


























































