
सामना ऑनलाईन। लखनौ
श्री रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारला राममंदिराची आठवण करून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्यावासियांनी त्यांचे जंगी स्वागतही केले. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या आधी पोहचलेल्या हजारो शिवसैनिकांचे स्वागतही आगळ्या थाटात करण्यात आल्याचे चित्र फैजाबाद स्टेशनवर पाहायला मिळाले. शिवसैनिकांवर येथील मुस्लीम बांधवांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे जोरदार स्वागत केले. यात मुस्लीम महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिवसैनिकांनीही जय भवानी , जय शिवाजी अशी घोषणाबाजी करत सगळा स्टेशन परिसर दणाणून सोडला.
उद्धव ठाकरे अयोध्येत येणार असल्याने संपूर्ण अयोध्येत कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी मुंबई- महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक येथे पोहचणार असल्याने स्थानिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण परिसर भगव्या पताका व फुलमाळांनी सजवण्यात आला होता. यामुळे अयोध्येत भगवेमय वातावरण झाले होते. हे बघितल्यावर शिवसैनिकांचा उत्साह अधिकच वाढला होता. स्थानिक जनतेनेही शिवसैनिकांचे मनपूर्वक स्वागत केले.
























































