सरकार पाच वर्षे टिकेल, अजित पवार यांचा विश्वास

628
ajit-pawar

महाविकास आघाडीचे खातेवाटप झाले असले तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला आणखी एक मंत्रीपद मिळू शकते. डिसेंबर संपायच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थखाते राष्ट्रवादीकडे ठेवले आहे असे सांगतानाच तिन्ही पक्षांनी वाद टाळले तर सरकार पाच वर्षे  टिकेल असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे तीन आमदारांमागे एक मंत्रीपद या सूत्राप्रमाणे राष्ट्रवादीला जिह्यात तीन मंत्रीपदे मिळायला हवीत. आमदारांना उद्देशून अजित पवार म्हणाले, नागपूर अधिवेशन फक्त सहा दिवसांचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सगळे दिवस उपस्थित राहावे. लग्नकार्य करत बसू नका. खासकरून दत्तात्रय भरणे यांना सांगणे आहे असा टोला त्यांनी लगावला. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे भरपूरजण पक्षात येण्याचा प्रयत्न करतील. त्यांना तपासूनच घेणार आहोत. काही लोक तिकडे गेल्याने पक्षाचे ओझे कमी झाले, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच!

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेणार का या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत करण्यात येईल. पंकजा मुंडे यांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या