
विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याया तिघांच्या टोळीला राहुरी व नगर एमआयडीसी येथून गजाआड करण्यात आले आहे. नगर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
किशोर खामकर (वय 32, रा. राजुरी, ता. राहाता), किशोर शिणगारे (वय 28, रा. गोमाळवाडी, ता. नेवासा), अभय काळे (वय 24, रा. शिरसगाव, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत. सागर रोहिदास मोहिते (रा. शिरसगाव, ता. नेवासा), विवेक लक्ष्मण शिंदे हे दोघे फरार आहेत.
खामकर व शिणगारे यांना राहुरी फॅक्टरी येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे व मोपेड असा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबत सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचदरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीवरून शेंडी बायपास चौकात सापळा लावून अभय काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याचा साथीदार विवेक शिंदे हा फरार आहे. दोन्ही गुह्यांतील आरोपींकडे गावठी कट्टे कोठून आणले, याबाबत चौकशी केली असता, हे गावठी कट्टे व काडतुसे सागर मोहिते याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, पोलीस नाईक भीमराज खसे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे


























































