
सामना प्रतिनिधी । नगर
राज्यात दोन महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला विरोधकांपेक्षा स्वपक्षातील दुफळीने ग्रासले आहे. धुळ्यात अनिल गोटे यांनी भाजपला धारेवर धरलं आहे, तर नगरमध्ये केडगाव हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर यांच्या समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना तिकीट दिल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आला आहे. पार्टी विथ डिफरेन्स म्हणणाऱ्यांनी असे का केले, असा प्रश्न आता पक्षातीलच कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. मंगळवारी केडगाव मधील दोन पदाधिकाऱ्यांनी या घटनेनंतर राजीनामाही दिला आहे.
महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काल रात्री अनेक घडामोडी घडल्या. नगर भाजपमध्ये अविश्वास उफाळून आला आहे. तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी केडगावात केलेल्या नवीन सोयरिकीमुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. काँग्रेस व शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपाने घडविलेल्या या भूकंपाचे धक्केही केडगावच्या भाजपमध्येच बसण्यास सुरुवात झाली आहे. केडगाव मधील दोघांनी पक्षाच्या या भूमिकेविरोधात पक्षाकडे राजीनामे सोपवले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने विशेषतः खासदार दिलीप गांधी व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ऐनवेळी राजकीय खेळी करत केडगाव मधील कोतकर ‘कंपनी’ला पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे केडगावमध्ये इच्छुकांनी पक्षाकडे मुलाखती देऊनही उपयोग झाला नाही. याचे तीव्र पडसाद आता उमटू सुरुवात झाली आहे. कोतकर यांना गेल्या पंचवीस वर्षापासून विरोध करत असताना आता ऐनवेळी पक्षाने कसे घेतले, असा प्रश्न कार्यकर्ते या माध्यमातून विचारू लागले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी चांगलीच उमटण्यास सुरुवात झालेली आहे.




























































