त्या चार कर्मचाऱयांची अटक सबळ पुराव्यांच्या आधारेच, नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवासंदर्भात राज्यस्तरीय समितीची चौकशी व पोलीस तपास हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही तपासाच्या आधारे व आमच्याकडे असलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारेच चारजणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कलम 164 अन्वये तिघांची साक्ष घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.

नगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडप्रकरणी चारजणांना अटक केल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अ. के. मांडवगडे यांनी त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आतापर्यंत दहा ते बारा जणांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य शासनाने नेमलेली चौकशी समिती उद्या नगरमध्ये येणार आहे.

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांचे कामबंद आंदोलन
कारवाईविरोधात कर्मचारी संघटनेपाठोपाठ डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे. आज सकाळी जिल्हा रुग्णालयाचे कामकाज बंद करून निषेध व्यक्त केला. जिल्हा रुग्णालयातील तातडीची सेवा वगळता सर्व विभाग बंद ठेवण्यात आले आहेत.

खासगी रुग्णालयांचा आज बंद
या आंदोलनास इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दिला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या बंद पुकारण्यात आला आहे. उद्या खासगी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता, ओपीडी व इतर विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत.