
जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील तिसरा मजल्याला शुक्रवारी अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेसह एमआयडीसीचे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीमध्ये बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही.
नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमाराला अचानक आग लागली. कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. मनपाचे अग्निशमन दल तत्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दलही दाखल झाले. सुमारे एक ते दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
घटनेनंतर नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये बँकेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, लेखापरीक्षण विभागातील सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहेत.
जिल्हा बँकेत साडेसहा ते सात वाजेच्या सुमाराला आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो असून, आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या तिसऱया मजल्यावर जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा बँकेची काही विभागाची कार्यालये आहेत. सायंकाळी 6.45 वाजता बँकेच्या लेखापरीक्षण विभागामधून धूर निघाल्याचे निदर्शनास आले. या आगीत लेखापरीक्षण विभागाची खोली पूर्णपणे जळून खाक झाली असून, उपनिबंधक कार्यालयाचे नुकसान झाले नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.
नगर जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षण विभागाला आग लागली असून या आगीमध्ये लेखापरीक्षण विभाग जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली या संदर्भातील चौकशी केली जाईल. आगीमध्ये फायली जळाल्या आहेत. आग कशामुळे लागली याची माहिती घेतली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांनी सांगितले.


























































