महाविकास आघाडीची मुसंडी, 97 पैकी 57 नगरपंचायतींवर वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीतील 97 नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस 344, काँग्रेस 316 व शिवसेनेला 284 जागांवर विजय मिळाल्याने एकूण 944 जागांवर महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपला 384 जागा मिळाल्या असल्या तरी 97 पैकी 57 नगरपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

राज्यातील 106 नगरपंचायती व भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झाली होती. सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणुक झाली. ओबीसींचे राजकीय आरक्षण कोणामुळे गेले यावरून या निवडणुकीत बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला कौल मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पुढील दोन-तीन महिन्यात 17 महापालिका व 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार असल्याने ही या निवडणुकीच्या निकालाला अधिक महत्व आले होते. मिनी विधानसभेच्या या रंगीत तालमीत मतदारांनी भाजपला धोबीपछाड देत महाविकास आघाडीतील पक्षांना भरभरून यश दिले. आघाडीतील तिन्ही पक्षांना स्वतंत्र लढूनही चांगले यश मिळाले आहे.

राष्ट्रवादीचे 344 नगरसेवक निवडून आले आहेत, तर 25 नगरपंचायतींमध्ये बहूमत मिळाले आहे. भाजपाला 24 नगरपंचायतीची सत्ता व 384 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 18 नगरपंचायची आणि 316 जागा तसंच शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 284 जागा मिळाल्या आहेत. निकाल जाहीर झालेल्या 96 नगरपंचायतींपैकी 57 नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची, तर भाजपाकडे 24 नगरपंचायतीची सत्ता मिळाली आहे. तर 16 ठिकाणी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही.

दिग्गजांना फटका !

या निवडणुकीत अनेक मंत्र्यांना व दिग्गज नेत्यांना आपल्या मतदारसंघातील, जिह्यातील नगरपंचायती पक्षाकडे राखता आलेल्या नाहीत. धनंजय मुंडे, विश्वजित कदम, शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे, एकनाथ खडसे , गिरीश महाजनांसह अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे.

महाविकास आघाडीला 80 टक्के जागा – नवाब मलिक

नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला 80 टक्के जागा मिळाल्या आहेत, याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे. जनतेचा कौल राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाजूने आहे. काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्बळावर लढले तर काही ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी युती होती. असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारडय़ात आपला काैल टाकला आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांचा प्रस्थापितांना धक्का

सांगली-जिह्यातील कवठेमंहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे 23 वर्षीय चिरंजीव रोहित पाटील यांनी प्रस्थापितांना धक्का देत एकहाती सत्ता घेतली. कडेगाव नगरपंचायतीत विद्यमान कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना पराभवाचा धक्का बसला. जिह्यातील या तीन नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने काही ठिकाणी नवी राजकीय समीकरणे उदयास आली. तर, अनेक प्रस्थापितांना झटका बसला आहे.

कर्जतमध्ये भाजपचा खुर्दा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला पुन्हा धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. 17 पैकी 15 जागा या दोन पक्षांनी जिंकल्या असून, भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.

पडळकरांच्या पॅनेलचा सुपडा साफ

महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून बेछूट टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलाच धक्का बसला आहे. खानापूर नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस- शिवसेना महाविकास आघाडीने 9 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. पण पडळकर यांच्या पॅनलला साधा भोपळाही फोडता आला नाही.

पारनेरमध्ये त्रिशंकू अवस्था

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पारनेर नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, शहर विकास आघाडीला दोन, तर भाजपला एक जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने नगर पंचायतीच्या सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला शहर विकास आघाडी व अपक्ष उमेदवारांवर विसंबून राहावे लागणार आहे.

सोलापुरात स्थानिक आघाडय़ा

सोलापूर जिल्हय़ातील पाच नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडय़ांनीच वर्चस्व ठेवल्याचे दिसून आले. माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, म्हाळुंगे-श्रीपूर या तीन नगर पंचायतीतील 51 जागांपैकी 38 जागा मोहिते-पाटील समर्थकांच्या स्थानिक आघाडय़ांना मिळाल्या. जिल्हय़ात वैराग राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर माढा काँग्रेसने जिंकले आहे.

भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काँग्रेसची कामगिरी सुधारली – नाना पटोले

राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत़ निवडणुकीत जनतेने काैल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला असून भाजपला नाकारले आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

नगर पंचायत निवडणूक निकाल

  • एकूण जागा 1802
  • निकाल जाहीर 1638

पक्षनिहाय मिळालेल्या जागा

  • भाजप – 384
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 344
  • काँग्रेस – 316
  • शिवसेना – 284
  • अपक्ष -206
  • नोंदणीकृत पक्ष – 82
  • सीपीआय एम – 11
  • बसप – 04
  • मनसे – 04
  • अन्य – 03

भाजपकडे 19 नगरपंचायती

भाजपने थेट 19 नगरपंचायतींवर विजय मिळविला असून मित्रपक्ष व आघाडय़ा करून 24 नगरपंचायतीत वर्चस्व मिळवले आहे. यामध्ये गोंदियातील देवरी, चंद्रपूरमधील पोंभूरणा, नाशिकमध्ये देवळा, भंडाऱ्यातील मोहाडी, लोखंदूर, सिंधुदुर्गमधील दोडामार्ग, ठाण्यात मुरबाड, बीडमधील शिरूर-कासार नगरपंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

9 ठिकाणी आज मतमोजणी

गडचिरोली जिह्यातील नऊ नगर पंचायतींची मतमोजणी गुरुवारी होऊन निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तर शिर्डी नगर पंचायतीच्या एकूण 17 पैकी 11 प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने तेथे मतदान झाले नाही.

आबा, मिस यू!

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी विरोधकांचा धुक्वा उडवत राजकारणात यशस्वी प्रवेश केला. या विजयावर प्रतिक्रिया देताना रोहित पाटील म्हणाले, आबा, मिस यू! विरोधकांनी निवडणुकीत माझा बाप काढला. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

माणगाव, मोखाडा, खालापूर, शहापूर, पोलादपूरवर भगवा

रायगड जिह्यातील खालापूर, माणगाव, पोलादपूर, ठाणे जिह्यातील शहापूर तर पालघर जिह्यातील मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. खालापुरात शेकापला व माणगावात राष्ट्रवादीला धक्का देत शिवसेनेने सत्ता काबीज केली. तर मोखाडा, शहापूर आणि पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेने सत्ता कायम राखली. या विजयानंतर शिवसैनिकांनी गुलाल उधळत व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

खालापुरात शिवसेना व आघाडीने 9 जागा, माणगावात शिवसेना आघाडीने 9 जागा तर शिवसेनेने पोलादपुरात 10 जागांवर विजय मिळवला. मोखाडय़ात 8 जागा तर शहापूरमध्ये 10 जागा मिळवत सत्तेवर शिक्कामोर्तब केले. तलासरीत कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. सत्तेसाठी शिवसेना किंगमेकर ठरणार आहे.