बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला शनिवारी हैदराबाद येथून अटक करण्यात आली. त्याला रविवारी पारनेर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बाळ बोठे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याचा खुलासा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केला आहे. त्यात माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती बोठे याने लिहून ठेवल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, बाळ बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी हैदराबादेत 5 दिवसांचे सर्च ऑपरेशन राबवले. त्यासाठी पोलिसांनी एकूण 6 पथके बनवली होती. या काळात बाळ बोठे 3 वेळा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. आरोपीने आपला फोन रात्री बंद केला होता. पोलिसांनी हैदराबादेतील 5 हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला; पण अखेर तो 6व्या हॉटेलमध्ये लपून बसल्याचे आढळून आले. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात आत्महत्येचा उल्लेख असून, त्याचबरोबर माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला, तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती लिहून ठेवण्यात आली आहे.

अटक केल्यानंतर बोठेने आजारपणाच्या तक्रारी सुरू केल्याने वैद्यकीय तपासणीही करून घेण्यात आली. आरोपीची कोणतीही बडदास्त ठेवली जात नसून केवळ आरोपीची सुरक्षा आणि संभाव्य कायदेशीर वाद टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. बोठेला ताब्यात घेतल्यानंतर वेळेत न्यायालयासमोर हजर करणे गरजेचे होते. मात्र, पारनेर येथे वेळेत पोहोचणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर शनिवारी रात्री 11.30 वाजता बोठे याला जामखेड न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मालमत्ता वाचविण्यासाठी राचकोंडा पोलीस आयुक्तालयात गेल्याचे भासविले

आरोपीने पोलीस आणि कायद्यापासून बचावाचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. इकडे मालमत्ता जप्तीची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने राचकोंडा पोलीस आयुक्त कार्यालयात आपण गेल्याचे दाखवून देण्यासाठी तेथे जाऊन केवळ नोंद केली. मात्र, आत न जाता तो तेथून निघून गेला. तेथे मूळचे नगर जिह्यातील महेश भागवत पोलीस आयुक्त आहेत. मात्र, बोठेने त्यांची भेट घेतली नाही. केवळ तेथे गेल्याचे भासवून आपण फरारी नसून आपण कायदेशीर प्रयत्न करीत आहोत, हे न्यायालयात दाखविण्याचा प्रयत्न असावा, असा संशयही पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, फरार असणारी पी. अनंतलक्ष्मी सुब्बाचारी ही महिला आरोपी बोठेला मदत करणारा वकील जनार्धन चंद्रप्पा याची मदतनीस असल्याचेही पाटील यांनी सांगितल.

पोलीस आल्याचे लक्षात येऊ नये यासाठी खासगी गाडय़ा

जरे यांचा मुलगा रुणाल यांनी आरोपीची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पाटील यांनी यासंबंधी पोलिसांची बाजू मांडली. ते म्हणाले, हैदराबादमध्ये कारवाई करताना पोलीस आल्याचे आरोपींच्या लक्षात येऊ नये, यासाठी खासगी गाड्या वापरण्यात आल्या होत्या. तेथून आरोपीला नगरला सुरक्षित आणणे आव्हानात्मक काम होते. त्यामुळे पळून जाण्याची संधी न मिळता सुरक्षित प्रवास करता येईल, अशी गाडी वापरण्यात आली. यात आरोपीची बडदास्त ठेवण्याचा विषय नाही.

बोठेच्या पोलीस कोठडीत सीसीटीव्ही लावणार

आरोपी वकील असल्याने त्याच्याकडून कायदेशीर पळवाटा शोधण्याचा सतत प्रयत्न होत आहे. त्यामुळे पोलिसांनीही पुरेपूर काळजी घेतली असून, आरोपीला पारनेर न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने त्याला बेडयाही घालण्यात आल्या होत्या. सुरक्षेचा विचार करून त्याला कोणताही बनाव करता येऊ नये यासाठी स्वतंत्र पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अटक झाल्यापासून त्याने आरोग्याच्या तक्रारी सुरू केल्या आहेत. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला नगरला घेऊन येत असतानाच रस्त्यातच असणाऱ्या सोलापूर येथील रुग्णालयात तपासण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

पथकांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

परप्रांतात जाऊन भाषक आणि अन्य अडचणींवर मात करून सहा पोलीस पथकांनी ही कारवाई केली. त्याबद्दल त्या पथकांचा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सत्कार केला. त्यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसेही देण्यात आली. अतिशय कौशल्याने पोलिसांनी तपास केला असून, यापुढेही निःपक्ष आणि कायदेशीर पद्धतीनेच तपास केला जाईल. इतर आरोपींना कायद्यानुसार जी वागणूक दिली जाते, तीच याही आरोपींना दिली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

बोठे याला न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. घटना घडल्यानंतर बोठे तीन महिन्यांपासून फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली, जरे यांची हत्या त्याने का केली, याचा उलगडा करण्यासाठी बोठे याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील सिद्धार्थ बगळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बोठेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.