नगरच्या शिक्षकाने वाचवला दुर्मिळ महाकाय कासवाचा जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tortoise-new

सर्प व अन्य प्राण्यांना मारण्यासाठी धावणारे अनेकजण असतात, मात्र त्यांना जीवदान देऊन भूतदया दाखवणारे विरळच! नगर जिल्ह्यातून राधानगरी तालुक्यात पाहुणचारासाठी आलेल्या शिक्षकास परतीच्या प्रवासात दुर्मिळ व तब्बल वीस किलो वजनाच्या महाकाय कासवाला जीवदान देण्याचे भाग्य लाभले. रामचंद्र घोलप असे या शिक्षकाचे नाव असून त्यांच्या या भूतदयेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नेवासा जिल्ह्यातील शिक्षक रामचंद्र घोलप हे बुजवडे येथे आले होते. ते मुळचे शाहूवाडी तालुक्यातील रेठरे
गावचे. त्यांनी राधानगरी-शिरगांव मार्गे परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान शिरगाव आमजाई व्हरवडे येथील बंधाऱ्याजवळ भोगावती नदी काठावर अमोल खरमाटे व गणेश साळुंके यांना एक दुर्मिळ प्रजातीचे कासव दिसले. त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होती पण या कासवाला पकडण्याचे धाडस कोणी करीत नव्हते.

याचवेळी योगायोगाने तिथे उपस्थित असणाऱ्या रामचंद्र घोलप यांनी प्रसंगावधान राखून सुमारे वीस किलो वजनाच्या या दुर्मिळ महाकाय कासवाला भोगावती नदीच्या प्रवाहात सोडून जीवदान दिले. घोलप हे एक प्रसिद्ध सर्पमित्र असून आजपर्यंत त्यांनी सुमारे चारशेहून अधिक सापांना व चाळीसहून अधिक कासवांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या भूतदयेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

जलप्रदुषण रोखणे व शुद्धीकरण करण्याचे काम कासव करते. भूतलावर 220 प्रकारच्या कासवांच्या जाती असून 100 ग्रॅमपासून 500 कि . ग्रॅ .पर्यंत कासवाचे वजन व दीडशे वर्षे जीवनकाल पहायला मिळतो. सापडलेले कासव हे सरीसृप गटातील व कूर्म गणातील असून त्याचे वजन अंदाजे 20 कि . ग्रॅम होते . कासवे दुर्मिळ होत चालली असून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे सर्प व कासवमित्र रामचंद्र विठ्ठल घोलप यांनी ‘दै.सामना ‘शी बोलताना स्पष्ट केले.