
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला झाला असून या मार्गावर जलद आणि आरामदायी एसटी बस चालवली जाणार आहे. गुरुवार, 15 डिसेंबरपासून नागपूर-शिर्डी एसटी बससेवा सुरू होणार आहे. एसटी बसमध्ये प्रवाशांना 2X1 पद्धतीची 30 आसने (पुशबॅक पद्धतीची) तर 15 शयन आसने (स्लीपर कोच) आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे इंधन आणि वेळेचीही बचत होणार आहे. त्याचबरोबर नागपूर ते संभाजीनगर (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. ही बससेवा नागपूर व संभाजीनगर या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10 वाजता सुटेल व जालनामार्गे पहाटे 5.30 वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 किमी व प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे. या बससेवेमुळे नागपूर ते संभाजीनगर या प्रवासासाठी प्रौढांसाठी 1100 रुपये तर मुलांसाठी 575 रुपये इतके प्रवास भाडे आहे. नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रौढांसाठी 945 रुपये आणि मुलांसाठी 505 रुपये इतके प्रवास भाडे आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
बससेवेची वैशिष्टय़े
नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 9 वाजता सुटणार असून पहाटे 5.30 वाजता नियोजित स्थळी पोहोचणार आहे.
सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 किमी आणि वेळेमध्ये 4.15 तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रौढांसाठी 1300 रुपये आणि मुलांसाठी 670 रुपये इतके प्रवास भाडे आहे.
75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 टक्के सवलत एसटी महामंडळाने जाहीर केली आहे.





























































