
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यातील एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्सप्रेसवर झळकणार आहेत.
शनिवारी (14 डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. याबाबत अधिक माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, या एक्सप्रेसच्या बोगीवर ही निसर्गचित्रे लावून नागझिरा अभयारण्य व बोधलकसा पर्यटक निवासाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असल्याने तिच्या सतरा बोगींवर ही चित्रे लावण्यात येणार आहेत.






























































