
>>नमिता वारणकर
ज्येष्ठ नाटककार, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि साहित्यिक अशोक समेळ…हे गेली पन्नास वर्षे मराठी आणि गुजराती रंगभूमीवर नवनवे प्रयोग करत आहेत. त्यांच्या ‘अश्वत्थामा’…या महाकादंबरीनंतर ‘ते आभाळ भिष्माचं होतं’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकाची नोंद ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. या नाटकाचे त्यांनी 40 तासांत 11 प्रयोग केले. लेखक अनिल बर्वे यांच्या अनेक कादंबऱ्यांची त्यांनी नाट्यरुपांतरे केली आहेत. आज 80व्या वर्षीही ते नव्या उमेदिने नाटक, लेखन, संशोधन करत आहेत. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन…भविष्यात करत असलेले नवे संशोधनात्मक कादंबरी लेखन आणि हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीबाबत कोणते नवीन बदल होणे अपेक्षित आहे याविषयी त्यांच्याशी केलेली बातचित.
अभिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक असा आपला प्रवास फार जुना आहे. या प्रवासाची सुरुवात, आपण करत असलेल्या वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग याविषयी ज्येष्ट नाटककार अशोक सांगतात की, अभिनेता म्हणून ‘पुत्रकामेष्टी’ या नाटकापासून सुरुवात झाली. ‘मी मालक या देहाचा’ या नाटकातही त्यांनी अभिनय केला. त्यानंतर ‘डोंगर म्हातारा झाला’ या कादंबरीच नाट्यरुप प्रभाकर पणशीकरांना करून हवं होतं, पण त्या कादंबरीचे लेखक अनिल बर्वे यांनी त्याचं नाट्यरुपांतर करायला नकार दिला. तेव्हा त्यांच्या विचार मनात आला की, जर अनिल बर्वे लिहून देत नसतील तर आपण त्याचं रुपांतर का करू नये? ‘डोंगर म्हातारा झाला’ या त्यांच्या कादंबरीचं नाट्यरुपांतर करायचं ठरवलं, पण अनिल बर्वे नाटक लिहून देत नव्हता. तरीही प्रयत्न फुकट जाईल, पण करायला हरकत नाही, असं ठरवून मी हे नाटक लिहायचं ठरवलं. जवळजवळ अडीच वर्षे या कांदबरीचं नाट्यलेखन सुरू होतं. या नाटकाचा पहिला यशस्वी प्रयोग रिझर्व्ह बँकेच्या एकांकिका स्पर्धेला पंचवीस वर्ष झाली त्यावेळी केला. हे नाटक बघून प्रभाकर पणशीकर म्हणाले, ‘खऱ्या अर्थाने हे नाटक यशस्वी झालं. व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकाचा प्रयोग करुया.’, असे ते म्हणाले, पण त्यांना या नाटकाकरिता ज्येष्ठ अभिनेते निळू फुले हवे होते, पण ते त्यांच्या कामात प्रचंड व्यस्त होते. त्यामुळे निळू उपलब्ध नव्हते. अश्रुंची झाली फुले या नाटकामध्ये ‘मी शंभू महादेव’ ही भूमिका नाटाकाचे 750 प्रयोग केली. त्यामुळे अडीच वर्षे ते रंगभूमीवर सादर झालं नाही, आणि निळू फुलेही तेव्हा उपलब्ध नव्हते. त्यावेळी नट म्हणून प्रभाकर पणशीकरांच्या नाटकात काम करत होतो. ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रुंची झाली फुले’ याशिवाय ‘मी शंभु महादेव’ या नाटकाचे 700 प्रयोग केले. इतर सर्व नाटकांचे प्रयोग सुरू असतनाच लेखक म्हणून रंगभूमीवर आपण काम करावं, याकरिता ‘ऋग्वेद’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली.
त्यानंतर ‘ऋग्वेद’ या नाट्यसंस्था आणि रिझर्व्ह बँकेचे कलाकार मित्र बाळा रणखांबे, विजयन नायर यांच्या सहकार्याने ‘डोंगर म्हतारा झाला’ हे हौशी रंगभूमीवरील नाटक व्यावसायिक रंगभूमीवर ऋग्वेद या संस्थेतर्फे सादर झालं. शिवाजी मंदिरला सादर झालेला या नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला. कॉम्रेड डांगेंसारखी मोठी माणसं या नाटकाचे प्रयोग बघायला आले. त्यांना ते विलक्षण आवडलं. या नाटकाच्या प्रयोगानिमित्त ‘मामा वरेरकर’ पुरस्कार अशोक समेळ यांना मिळाला. याशिवाय त्यावेळी नाटकासाठी दिला जाणारा सर्वात मोठा ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार लेखक म्हणून उत्पल दत्त यांच्या हस्ते मिळाला. त्यानंतर लेखक, दिग्दर्शक आणि नाटटकार म्हणून जबाबदारीत वाढ झाली, असे अशोक समेळ सांगतात.
पिंजराचे 250 प्रयोग, ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाचा भाग 2 ‘केशव मनोहर लेले’ 100 प्रयोग केले. ‘अश्रुंची झाली फुले’ पुन्हा रिव्हाईव्ह केलं होतं. प्रभाकर पणशीकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. कारण ‘अश्रुंची झाली फुले’ आपण पुन्हा करूया, असे ते म्हणाले होते. म्हणून त्याचे 51 प्रयोग करायचे, असं ठरवलं होतं. विशेष म्हणजे सगळ्या 51 प्रयोगांना उत्तम बुकिंग मिळालं. शेवटच्या 51 व्या प्रयोगाला मिसेस पणशीकरांचा सत्कार केला आणि नाटक बंद केलं, अशी आठवणही त्यांनी आवर्जून मुलाखतीदरम्यान सांगितली.
समेळ यांनी आजपर्यंत 61 नाटकं लिहिली आहेत. त्यातली 27 गुजराथी आहेत. नट म्हणून माझा नाटकं लिहिण्याचा प्रवास सुरू होता. दिग्दर्शक म्हणून माझ्या संस्थेला बाहेरचा दिग्दर्शक मला परवडेनासा झाला, त्यामुळे स्वत: दिग्दर्शनात उतरलो. नट होतो, त्यानंतर लेखक झालो, निर्माता झालो आणि त्यानंतर दिग्दर्शक झालो. असा 1982 पासून सुरू झालेला प्रवास आजमितीपर्यंत सुरू आहे, अशी आठवण सांगून ते म्हणाले की, आजही नाटकात अभिनेता म्हणून काम करतो. 2018 साली करोनाच्या आधी माझं ‘संभव-असंभव’ हे नाटक रंगभूमीवर आलं. दूरदर्शनकरिता 2000 मालिकांपेक्षा जास्त मालिका लिहिल्या. त्यातल्या दीड हजार सह्याद्री दूरदर्शनसाठी लिहिल्या आहेत. बाकीचे 200 भाग ‘सांजभूल’ या झीच्या ‘अल्फा मराठी’ या वाहिनीसाठी लिहिले. ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक सगळ्यात गाजलं. ज्याला अनेक पुरस्कार मिळाले. राजा रवी वर्मा यांच्यावरील नाटक बीएसईस कंपनीच्या शेवटच्या फेरीत 421 नाटकांत पहिलं आलं. हे माझं माईल स्टोन नाटकं. दुसरं माझं माईल स्टोन नाटक ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हे विवेकानंदांवर आधारित आहे. या नाटकाचे 40 तासांत 11 प्रयोग झाले आहेत. त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. या नाटकाचे प्रयोग कसाबसारख्या अतिरेक्याला विवेकानंदांच्या विचाराने उत्तर देण्याकरिता करण्यात आले होते. ‘ज्ञानोबा माझा’ नावाचं नाटक लिहिलं, त्या नाटकांचा प्रयोग आळंदीला ज्ञानोबांकडे पालखी जाते. त्यावेळी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित सादर केला.
‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाच्या आठवणीविषयी ते सांगतता की, या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. यासोबत मालिका, अभिनय असं सगळं सुरूच होतं. यानंतर हळूहळू नाट्यलेखन करतच होतो त्यानंतर कादंबरी लेखनाच्या टप्प्याकडे ते वळले. बालपणापासून ‘अश्वत्थामा’ विषयी त्यांना आकर्षण होतं. अश्वत्थाम्याने महाभारत संपवलं, त्याच्याविषयीची माहिती मिळवायला त्यांनी सुरुवात केली. हा त्यांचा शोध बरीच वर्षे सुरू होता. याकरिता महाभारताचे 18 खंड त्यांनी वाचले. त्यामध्ये त्यांना अश्वत्थामा दूर्योधनासोबत बसला होता, अश्वत्थामा धर्मराजाशी गप्पा मारत होता, द्रोणाचार्यांशी बोलत होता, अशी माहिती वाचायला मिळाली. अश्वत्थामा युद्धाचा शेवट करतो त्याचं स्वरुप विकृत, भेसूर आणि चिरंजीव आहे. युद्धाच्या 18व्या दिवशी तो पांडवांच्या शिबिरात जाऊन झोपलेल्या पांडवांना ठार करतो. अशा अश्वत्थाम्याचा शोध घेण्यासाठी ते सातपुड्याच्या अस्तंबा पर्वतावर पोहोचले. दर दिवाळीला येथे अश्वत्थाम्याची जत्रा भरते. लाखो लोक तिकडे जत्रेला येतात. या जत्रेत आदिवासींची संख्या जास्त असते. तिथल्या आदिवासींसोबत ते स्वत: चार दिवस राहिले. तेव्हा त्यांनी पाहिले की, या आदिवासींकडे तेल, तूप नसतं. ते स्वत:साठी आणत नाहीत. पण ते जत्रेच्या आदल्या दिवशी दाराबाहेर बांधतात, पण ते दुसऱ्या दिवशी त्यांच्या झोपडीला नसतं. त्याचप्रमाणे तेथील उदयन नदीवर एक देऊळ अश्वत्थाम्याने बाांधलेलं आहे. येथील उदयन नदीवर तो स्नान करतो आणि त्या मंदिरात जाऊन फुल वाहतो, ती फुलं फक्त अश्वत्थाम्याकडे असतात. ही फुलं फक्त हिमालयात आढळतात. अश्वत्थाम्याला ही फुलं व्यासांनी दिली होती. ‘अश्वत्थामा’ या 700 पानांच्या महाकादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठता पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार मिळाले. याचा आनंद आहे, कारण हे माझं वैभव आहे. नंतर ‘स्वगत’ नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. त्यांच्या या आत्मचरित्राला आचार्य अत्रेंचा ‘कऱ्हेचं पाणी’ पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचाही पुरस्कार मिळाला. त्यांचे वर्गमित्र पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर. यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले असताना त्यांना गणपती त्यांच्याशी बोलतोय, असा साक्षात्कार झाल्यासारखा वाटला. या अनुभवाविषयी ते म्हणाले की, ‘गणपती माझ्याशी बोलतोय असं मला वाटलं की, तू महाभारताचा शेवट लिहिला. महाभारताची सुरुवात कोण लिहिणार ? भिष्मांवर लिही ना. तेव्हा जाणीव झाली की, आपण भिष्मांवर काहीच लिहिलेलं नाही. त्यावेळी माशेलकरांचा निरोप घेताना मी त्यांना म्हटलं, अरे, मी आता भिष्मांवर लिहितोय कळलं का, तेही म्हणाले लिही. त्यांच्याकडून परतताना माझ्या डोक्यात फक्त भिष्म होते. भिष्माचं लहानपणापासूनच स्वरुप कसं असेल, त्यानंतर पुस्तकांचं नावही माझ्या डोक्यात पटकन आलं. ते म्हणजे ‘हे आभाळ भिष्मांचं होतं.’ अशा प्रकारे ‘ते आभाळ भिष्माचं होतं’, या कादंबरीच्या संशोधनाला सुरुवात झाली. ही कादंबरीही वाचकांना प्रचंड आवडली.
गुजराती आणि मराठी रंगभूमीविषयी त्यांचं म्हणणं असं आहे की, गुजरातीमध्ये त्यांचं “पिंजरा’ हे नाटक कांती मढिया यांनी ‘काचिंडो’ या नावाने केलं. काचिंडो म्हणजे सरडा. ते नाटक गुजरातीत हिट झालं. नाटककार गुजरातीमध्ये कमी आहेत. मराठी नाटकांचं गुजराती भाषेत भाषांतर करून ते गुजराती प्रेक्षकांपुढे सादर होतं. गुजराती रंगभूमीला नाटकं लिहून देऊ लागलो. गुजराती प्रेक्षकांबद्दल अतिशय ते आदराने सांगतात की, गुजराती माणूस हा शनिवार, रविवार आपल्या मुला-बाळांना फक्त नाटकच दाखवतो. तो सिरियल बघत बसत नाही. 500 रुपये तिकिट असो, 700 रुपये तिकिट असो. तो तिकिट काढतो मुलाबाळांचं आणि नाटकंच बघतो. त्यामुळे गुजराती नाटकं चांगली चालतात. माझं ‘सुगंधनु सरनामू”, ‘पुछे छे डिकरी’ या नाटकाचे जवळजवळ 250 प्रयोग झाले. ‘सुगंधनु सरनामु’ या माझ्या नाटकाने 100 दिवसांत 100 प्रयोग केले. अशी खूप नाटकं गुजरातीतली ज्याचे 200-200 प्रयोग झाले आहेत. ही सगळी नाटक, मालिकेचे भाग या सगळ्याचं लेखन मी हाती केलं आहे. 30 हजारांपेक्षा जास्त पानं एकट्याने हाताने लिहिली आहेत. काही सिरियल्सची पाने आहेत ती रद्दीत गेली. अश्वत्थाम्याचं पहिलं वर्जन कुरुंदवाडला दिलं लायब्ररीला. अशा वाचनालयात मी माझी हस्तलिखित देत गेलो तरीही माझ्याकडे 8-10 हजार पानं अजून शिल्लक आहेत. माझी पत्नी मी लिहायला बसल्यानंतर मला अजिबात त्रास देत नाही. काहीतरी क्रिएटिव्ह काम करतोय याचा तिला आनंद वाटतो. त्याचं कामाचं कुटुंबियांना कौतुक असतं. जेव्हा कुटुंब खंबीरपणे आपल्या बाजूने उभं राहतं तेव्हाच काहीतरी आपण वेगळं करू शकतो.
शाळेच्या आठवणींविषयी ते सांगतात, शाळेत एकांकिका करत असू. माझे काका नाटकात काम करायचे. माझे आजोबा शाहूनगरवासी मंडळींमध्ये काम करायचे. ‘बेबंदशाही’ हे नाटक काकांच्या टाकसाळ कार्यालयात बसवलं होतं. त्यांना बाल शिवाजीची भूमिका करण्यासाठी एक कलाकार हवा होता. तेव्हा मी 7 वर्षांचा होतो. तेव्हा ते मला घेऊन गेले होते. तेव्हापासून पुढे रंगभूमीवर काम करू लागलो. क्रिकेट खेळत होतो. क्रिकेटर म्हणून माझं करियर फार उत्तम होतं. शिवाजी पार्क जिमखान्याला विजय मांजरेकर कॅप्टन असताना आणि 9 टेस्ट प्लेअर असताना खेळत असे. त्या टिममध्ये माझा नंबर लागत होता. क्रिकेट एवढं खेळलो की, 66-67साली मी रुपारेल कॉलेजचा क्रिकेटचा कॅप्टन होतो. क्रिकेट खेळामुळेच सेंट्रल बॅंकेत नोकरी मिळाली होती, पण या खेळाला वयाची मर्यादा असते. त्यानंतर नाटकाकडे संधी मिळाली आणि माझी पावले रंगभूमीकडे वळली, अशी आठवण त्यांनी सांगितली.
नाटककार अशोक समेळ यांनी 6 चित्रपट ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यासाठी, ‘पोरका’ हा चित्रपट अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्यासाठी, तर एक चित्रपट कलाकार वर्गीश यांच्यासाठी लिहिला होता. विविधांगी क्षेत्रात कार्यरत असतानाही दिग्दर्शक म्हणून नाटकात रमतो असं त्याचं म्हणणं आहे. दिग्दर्शन करायला सगळ्यात जास्त आवडतं,कारण दिग्दर्शकाला लेखकाने लिहिलेल्या संहितेचं भान ठेवावं लागतं. लेखकाने लिहिलेली संहिता त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांकडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते. ही पोहोचवताना तांत्रिक गोष्टीचं ज्ञानही दिग्दर्शकाला हवं. म्हणजे पार्श्वसंगीत, उत्तम लाईट्स, उत्तम नेपथ्य या गोष्टीचं भानही त्याला हवं, त्यामुळे दिग्दर्शन करणं हे सगळ्यात कठीण आहे आणि उत्तम दिग्दर्शन करायला मला आवडतं. दिग्दर्शन करणं हे माझं पॅशन आहे, असे ते कोणत्या कार्यक्षेत्रात मनापासून रमता या प्रश्नाला उत्तर देताना सांगतात.
भविष्यात कोणत्या नवीन कादंबरीचं लेखन करायचं ठरवलं आहे, याबाबत त्यांनी सांगितलं की, माझ्या प्रत्येक नाटकाचा आणि कादंबरीचा जन्म कसा झाला. या विषयावर सध्या लिखाण सुरू आहे. सध्या अजून एक विषय डोक्यात सुरू आहे. तो असा की, ‘द्रौपदी काल, द्रौपदी आज आणि द्रौपदी उद्या’ कशी असेल ? हा विषय खूपच छान आहे. यावर मी लिहिणार आहे, पण त्यासाठी मला पुन्हा संशोधन करायचं आहे. स्त्रियांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर आजकालचे जे वेगवेगळे प्रवाह आहेत. या प्रवाहात बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. हे प्रवाह येणे नैसर्गिक आहे, मात्र त्यामध्ये काही गैर नाही.
नाटक जगलं पाहिजे
गुजराती प्रेक्षक मराठी नाटकांना येतो. ‘पिंजरा’ या नाटकाचं जेव्हा ‘काचिंडो’ हे नाटक कांती मढियांनी केलं तेव्हा मी, पद्मा चव्हाण आणि डॉ. काशिनाथ घाणेकर त्या नाटकाला माझ्याबरोबर होते. त्यांना माझ्याविषयी भयंकर प्रेम होतं. डॉक्टर मला त्यांचा बच्चाच म्हणायचे. तेव्हा डॉक्टर नाटकाला माझ्याबरोबर आले होते. त्यावेळी गुजराती प्रेक्षक जो मला भेटायला यायाचा तो मला सांगायचा, ‘तमारा नाटक बहु वधारे सरस छे पिंजरा हमे दिनानाथमे जोएला छे’ म्हणजे दिनानाथमध्ये तुझं पिंजरा नाटक पाहिलं ते या ‘काचिंडो’ पेक्षाही चांगलं आहे. गुजराती प्रेक्षक हा दिनानाथला नाटक बघायला येतो, बोरिवलीच्या थिएटरला येतो. कारण मराठी नाटक गुजराती प्रेक्षक बघतो, पण मराठी प्रेक्षक गुजराती नाटक बघायला येतो , असे वाटत नाही; कारण आम्हाला आमचीच नाटकं बघायला वेळ नाही तर गुजराती कशी बघणार. तिकिटाचे दर कमी करा, अशी चर्चा असते. 500, 200, 100 असेच तिकिटाचे दर असतात, पण अजून किती कमी करणार. आम्हालाच नाटक करणं परवडत नाही. एक व्यक्ति जेव्हा 100 किंवा 200 रुपयांचं तिकीट काढते तेव्हा त्यामध्ये आमचे बॅकस्टेजचे मिळून जवळजवळ 20 कलाकार, आमच्यावर अवलंबून असलेले म्हणजे डोअर किपर, जाहिरातदार, लाईटमन, कचरा काढणारे असे 200 रुपयावर किती जण अवलंबून असतात. ते नाटक बघून आपण नाटक जगवू, असा कधी विचार येईल आपल्या मनात. हा विचार करून जेव्हा प्रेक्षक नाटकाला येतील तेव्हा नाटक खऱ्या अर्थाने जगेल. तेव्हा नटकाला गर्दी होईल. लिखाण सतत सुरूच असतं. दिग्दर्शन बऱ्याच नाटकांचं केलं आहे. तो माझ्या आवडीचा भाग आहे, ते मी करतो. आताही 80 व्या वर्षी नाटकात काम करत आहे. ‘तुला पाहिले रे’ नाटकात एकाच दिवशी दोन प्रयोग केले. हा न संपणारा प्रवास आहे, आणि तो करतच राहायचा. हात चालतात तोपर्यंत लिहित राहायचं, पाय चालतात तोपर्यंत चालत राहायचं, चेहरा दिसतो लोकांना चांगला तोपर्यंत काम करतच राहायचं, अशा प्रकारे आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
नाट्यलेखनाचा दर्जा सुधारायला हवा
हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपण काम केलंय. या तिन्हींमध्ये आता काही बदल झाले आहेत का? या प्रश्नाला ते उत्तर देतात की, अजूनही या तिन्ही नाटकाच्या प्रकारात नव्याने काही बदल झालेले नाहीत, मात्र एक नाटक याला अपवाद आहे. एक चांगलं नाटक रंगभूमीवर आलेलं आहे. तोच तोच प्रकार येतोय, पण आता मराठी रंगभूमी सुधारेल अशी आशा ठेवूया. 30 फुटांमध्ये सध्या आपण नाटक करतोय. सध्या नाटकाकरिता बॉक्स सेट असतो. यामध्ये प्रदीप मुळ्ये किंवा बेंद्रेंसारखे अनेक नेपथ्यकार नवीन प्रयोग करतात. रंगभूमीवरील नव्या बदलांकरिता लेखनाचा दर्जा सुधारायला हवा, असं वाटतं. लेखकाने काहीतरी नवीन दिलं पाहिजे. दिग्दर्शक नाटक वाचतो. लेखक नाटक लिहितो. निर्माता ठरवतो की, हे नाटक व्यवसाय करून देईल. एका नाटकाला 10 लाखांपर्यंत प्रॉडक्शन कॉस्ट लागते. एका प्रयोगाची किंमत साधारण 70 ते 1 लाखांपर्यंत. एका थिएटरचा खर्च, जाहिरात, अशा प्रकारे एका प्रयोगाचा खर्च 70 ते 80 लाखापर्यंत जातो. खरं सांगायचं तर मालिका बघायची लोकांना सवय झाली आहे. पूर्वीच्या बायका नवऱ्याला घेऊन नाटक बघायला यायच्या, पण आता सायंकाळी मालिका बघण्यात सगळे गुंग झालेले असतात. प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न असला, तरी नाटकाकडे प्रेक्षक वळत नाहीत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. यासाठी नाटकांमध्ये बदल झाला पाहिजे. उत्तम लेखक निर्माण झाले पाहिजेत. उत्तम नाटक आजच्या पिढीसाठी लिहिलं पाहिजे. नाटकाच्या जाहिराती वर्तमानपत्राव्यतिरिक्त कुठे प्रसिद्ध होतील, याचा अहंकार सोडून विचार व्हायला हवा. चांगल्या मुलांनी आजचे नवे विषय रंगभूमीवर आणणं खूप गरजेचं आहे.
कादंबरीचं नाट्यरुपांतर होताना…
कादंबरीचं जेव्हा नाट्य रुपांतर होतं तेव्हा कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करावं लागतं? लेखक अनिल बर्वे यांची अनेक नाटकं तुम्ही लिहिली आहेत. यशस्वी झालेत सगळे प्रयोग याविषयी सांगा, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, ‘अकरा कोटी गॅलन पाणी’ , ‘होरपळ’ या नाटकांना बक्षीस मिळाली. कादंबरीमध्ये लोकेशन हा प्रश्न नसतो. भरमसाठ कितीही लिहू शकते. स्थळाचंही बंधन नसतं. मनाने तू कुठलंही स्थळ लिखाणातून दाखवू शकतेस. सेटमध्ये कसं असतं 30 फुटांना मर्यादा असतात. त्या मर्यादेमध्येच काम करावं लागतं. कादंबरीकाराचे सगळे शब्द बदलावे लागतात. कादंबरी कादंबरीच्या जागेवर असते त्याचं नाट्य रुपांतर करताना त्याच्यातलं नाटक आपल्याला ओरबाडून काढायचंय, त्याच्या आसपासला लॉजिक असं द्यायचं की, त्याचं नाटक घडू शकेल. नाटकामध्ये नेपथ्य करावं लागतं. 30 फुटांमध्ये पहिली गोष्ट असते ती लोकेशन, त्यामध्ये असतात स्थळं. ती वेगवेगळ्या प्रकारे दाखवावी लागतात. विवेकानंदांचं ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हे अख्खं लेवलवर नाटक केलंय, त्या लेवलमध्ये विवेकानंद मद्रास, कन्याकुमारी, कलकत्त्याला गेलेत ते सगळे लेवलवर लाईट्सवर वर्क करत होतो. हा भाग करता येतो. व्यावसायिक नाटकं ही लेवलवर चालत नाहीत. व्यावसायिक नाटकांना सुंदर सेट, घर दिसलं पाहिजे. सुंदर आवडते नट-नट्या दिसल्या पाहिजेत. प्रायोगिक नाटक लोकेशनमध्ये बांधावं लागतं ही खरी नाटककाराची किमया आहे. कादंबऱ्यांवरून नाटक लिहिणारा मी नाटककार आहे. इंग्लिश कादंबऱ्यांचेही नाट्यरुपांतर केले आहे. ….’सेव्हन मिनिट्स’ वर मी जेव्हा नाटक लिहिलं तेव्हा ‘शपथ तुला जीवलगा’ या नाटकाची लोकेशन बदलली त्यावेळी ब्रिटिशांनी सांगितलेले कोड नंबर आजही कोर्टात चालू आहेत. घाईघाईने लिहिण्यापेक्षा संशोधन करून लिहायला मला आवडतं. ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक अडीच वर्षे मी लिहित होतो. त्यामुळे सत्य घटनेवर आधारित असलं की, नाटककाराचं पहिलं काम म्हणजे त्याची सत्यता पडताळून पाहणं हे असतं.
दिवाळीनिमित्त वाचकांना संदेश…
आठवणीतल्या दिवाळीविषयी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मी चाळीत राहात होतो. एकत्र कुटुंबात 27 माणसांच्या कुटुंबात त्यावेळी चाळीत राहायचो. त्यावेळी सगळ्यांचे एकाच प्रकारचे रांगेत लावलेले कंदिल. एकमेकांच्या घरी जाऊन फराळासाठी मदत करायचे. खेतवाडीतलं गिरगावातलं माझं वातावरण गरिबीतही श्रीमंती अशा प्रकारचं होतं. आज सगळं छान आहे, मजा करतो. आम्ही ते सगळे दिवस पुन्हा साजरे करायला बघतो. पण गेलेले ते दिवस परत येत नाहीत. ते त्या दिवसांपुरतेच मर्यादित होते. ‘रसिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आहेतच. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, करोनासारखा आजार पुन्हा न येवो आणि आला तरी त्याच्याशी आपण मुकाबला सगळ्यांनी मिळून करुया. तेव्हा जे दिवस आले होते ते पुन्हा न येवोत. आपण खऱ्या अर्थाने कोरोनानंतर यावेळी दिवाळी साजरी करतोय. सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो! प्रत्येकाचं भलं व्हावं, उत्तम व्हावं. जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळावं. परमेश्वराने सगळ्यांना आनंद द्यावा.




























































