मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश रद्द झाल्याच्या निषेधार्थ मोर्चा

सामना प्रतिनिधी। नांदेड

शासनाच्या दुर्लिक्षत कारभारामुळे मराठा समाजातील 250 वैद्यकीय प्रवेश रद्द झाले. याच्या निषेधार्थ व शासनाने याबाबत ठोस पावले न उचलल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातील आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश मिळाले. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे प्रवेश रद्द झाल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता आयटीआय येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चा काढण्यात आला.आचारसंहिता असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत विनंती केल्याने हा मोर्चा शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.

मराठा समाजाने कायदेशीर आणि घटनात्मक निकष पाळून आरक्षण मिळविले असताना शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे 250 मराठा डॉक्टरांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने याबाबत त्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश रद्द केल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे. मराठा समाजाला शासनाने अडचणीत आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला केंद्राने दिलेल्या आरक्षणापासून वंचित रहावे लागले. आरक्षणाला मराठा समाज राज्याबाहेर प्रवेश आणि सवलत मिळविण्यास पात्र असताना शासनाने मराठा समाजाला जाणिवपूर्वक त्यातून वगळत अडचणी निर्माण केल्या, असा आरोप यावेळी करण्यात आला. आता न्यायालयाच्या आदेशानुसार विचार करता राज्यात आणि देशात या तरुणांना कुठेच शैक्षणिक संधी मिळणार नसून राज्य शासनाच्या चुकीच्या कारभाराचा बळी ही तरुणाई पडली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या चुकीने या तरुणांचे आयुष्य आणि शिक्षण वाया जावू नये यासाठी वैद्यकीय जागा व त्यांचा कोटा वाढवावा व योग्य ती तरतूद करुन या मुलांच्या भविष्याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आयटीआयपासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. आपल्या मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना दिले.

या मोर्चात डॉ.संजय कदम, डॉ.सुनील कदम, डॉ.संभाजी कदम, डॉ.रेखा पाटील चव्हाण, डॉ.विद्या पाटील, डॉ.सुप्रिया गाडेगावकर, डॉ.भारती, मढवई, सारीका इंगळे, .व्दारका उबाळे, .छाया शिरफुले, डॉ.सुचीता बागल, मिनाक्षी पाटील, सावित्री जवळेकर, धनंजय सूर्यवंशी, संगमेश्वर लांडगे, श्याम वडजे, कपिल जाधव, अविनाश कदम, साई चिंचाळे, अमोल ढगे, संतोष पाटील शिंदे, वर्षा देशमुख, सुशीला सूर्यवंशी, दत्ता जाधव, चंद्रकांत टेकाळे, अमोल राजे, विनायक दवे, राजेश हंबर्डे, सुनील कदम, सुनिल भालेराव, साहेबराव कदम आदी मान्यवर यात सहभागी झाले होते.