
जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणार्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध रेती व्यवसाय करणार्या इसमावर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांच्या टीमने 17 मे 2026 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई केली. पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंजेगाव व बोंढार शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणारी एक बोट, एक आयशर वाहन, एसीई कंपनीची क्रेन, 20 तराफे, 6 इंजिन आणि 5 ब्रास रेती जप्त करत 1 कोटी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी माधव मोतीराम जाधव (25), इंद्रजितसिंघ केसरसिंघ सोखी (43), शेख अजीम शेख सलीम (28), पिंटू पाटील तिडके व अज्ञात चार इसम यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































