लोकसभा आणि राज्यसभेत मिळून यांचे शंभरही खासदार नाहीत,पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसने खोटं बोलून देशाला स्वप्नं दाखवली त्यामुळेच देशात त्यांची परिस्थिती खराब झाली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून यांचे शंभरही खासदार नाहीत. काही राज्यांत तर त्यांना खातेही उघडता आलेले नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेस चौथ्या-पाचव्या क्रमांकावर असून दुसऱ्यांच्या मदतीने ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसचे नेते पहिले गरिबी हटवणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, वन रँक वन पेन्शन योजना सुरू करणार असे म्हणत होते. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण एकही काम केले नाही. काही लोक केवळ गरीबांच्या नावाची माळ जपत बसतात आणि आपला महाल तयार करतात. त्यांना लोकांचे दुःख समजत नाही. त्यामुळेच बिहारच्या जनतेने जंगलराज आणि युवराज या दोघांनाही नाकारले, अशी टीका मोदी यांनी बिहार निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना केली.

बिहारमध्ये आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता लोकांना विकासाचा लाभ मिळत आहे. सरकारकडून लोकांना सिलिंडर, शौचालय, आयुष्यमानसारख्या योजनांद्वारे मदतही केली जात आहे. जे लोक समाजात फूट पाडून सत्तेपर्यंत पोहोचू पाहत आहेत त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले.

एनडीएमुळे बिहारमध्ये गरीबांना मतदानाचा हक्क

बिहारमध्ये निवडणूक म्हणजे एक गंमत बनवून ठेवली होती. चारही बाजूंना हिंसा, हत्या, बूथ कॅप्चरिंग. या लोकांनी बिहारच्या गरीब लोकांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतलेला होता. तेव्हा मतदान होतच नव्हते, गरीबांचे हक्क लुटले जात होते. बिहारमधील गरीबांना खऱ्या अर्थाने मतदानाचा हक्क एनडीएनेच मिळवून दिला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.