‘मी पुन्हा येणार’; फडणवीसांचे तुणतुणे सुरूच

पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा अधिकार आपल्याला आज नाही; मात्र उद्या, परवा तो मिळेलच असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ‘मी पुन्हा येणार’ असं तुणतुणे वाजवत पुन्हा मुख्यमंत्री होणार असा आशावाद व्यक्त केला.

अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाने बुधवारी परशुराम सायखेडकर नाटय़गृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री असताना आपण पत्रकारांच्या अनेक समस्या सोडविल्या, योजना अंमलात आणल्या. आजही पत्रकार संघाच्या पदाधिकाऱयांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या. मात्र त्या सोडविण्याचा अधिकार आज मला नाही. उद्या, परवा तो अधिकार प्राप्त होईलच असे सांगत त्यांनी, पुन्हा मुख्यमंत्री होणार असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी या पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे, प्रियदर्शन टांकसाळे, विलास पाटील आदी उपस्थित होते.

पक्षविस्तारासाठी भाजपात बाहेरून लोक

नाशिकमधील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाला गळती लागली का? असा प्रश्न केला असता फडणवीस यांनी भाजपतून इतर पक्षात गेलेले अनेकजण पुन्हा आमच्याकडे येतील असा दावा केला. निवडणुका आल्या की इतर पक्षातील लोकांना भाजपात प्रवेश दिला जातो. याकडे लक्ष वेधले, असता पक्षविस्तारासाठी बाहेरून लोक आणावे लागतात, असं ते म्हणाले.

अग्रलेख सणसणी तयार करण्यासाठी

वृत्तपत्रांनी विश्वासार्हता जपावी, समाजाच्या अभिव्यक्तीसाठी काम करावे. समाजाची वैचारिक बैठक तयार करण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काही लोक दररोज केवळ सणसणी तयार करण्यासाठी राजकीय अग्रलेख लिहितात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही वृत्तपत्राचे नाव घेतले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या