
नाशिक येथील लॉकडाऊनविषयीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लवकरच नाशिक दौरा होणार असून, त्यावेळी लॉकडाऊन व इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री घेतील,अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी प्रमुख अधिकाऱयांसोबत कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबईप्रमाणे नाशिक शहरातील प्रत्येक दवाखान्यासाठी महापालिकेने संपर्क अधिकाऱयाची नेमणूक करून रुग्णव्यवस्था, प्रवेश, बिलयावरील नियंत्रणाची जबाबदारी देत त्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करावेत. महापालिका रूग्णालयांमध्ये आयसीयू युनिट वाढवावेत. तज्ञ डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित कराव्या व स्टाफ कायमस्वरूपी वेतनपटलावर घेण्यात यावा, असे सांगितले.
जिह्यात कुठलाही रुग्ण उपचाराविना राहू नये. गंभीर आजार असलेल्या रुग्णांबाबत अधिक दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात. मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. लॉकडाऊन करावे, करू नये असे दोन्ही प्रकारचे नागरिकांमध्ये मतप्रवाह आहेत. लॉकडाऊन नव्याने केले तेथेही कोरोनाची साखळी तुटलेली नसून, लॉकडाऊनच्या भीतीने झालेल्या गर्दीतून मोठय़ा प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत असल्याने त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
या बैठकीतविभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती सांगून पुढील नियोजनाची दिशा स्पष्ट केली.

































































