देश रक्षणासाठी महायुतीला विजयी करा!-आदित्य ठाकरे

44

सामना प्रतिनिधी। नाशिक

देश रक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे. यासाठी महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सिडकोतील पवननगर येथे आयोजित जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. शिवसेना-भाजपा युतीने राज्यात आणि केंद्रात सर्वांगीण विकासाची कामे केली. वचननाम्यातील सर्व कामे पूर्ण केली. खासदार गोडसे यांनीही आपल्या कार्यकाळात नाशिकमध्ये विमानसेवा, रेल्वेसेवा, औद्योगिक विकासाची कामे केली, असे त्यांनी सांगितले. राज्यभर महायुती भक्कम असून, लोकसभेच्या संपूर्ण 48 जागा महायुतीला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले. देशात आज पाकिस्तानला धडा शिकविणारे, तेथे घुसून ठोकून काढणारे, 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यांच्याविरुद्ध 56 पक्ष एकत्र आले आहेत. 370वे कलम रद्द करण्यासाठी, देशद्रोह्यांना धडा शिकविण्यासाठी, हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार हेमंत गोडसे यांची भाषणे झाली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दादा जाधव, आमदार सीमा हिरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हजर होते.

राष्ट्रवादीचा उमेदवार जेलची हवा खाऊन आला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भ्रष्टवादी पक्ष असून, त्यांना थारा देऊ नका. सिंचन घोटाळा विसरू नका, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी संसदेत 86 टक्के हजेरी लावली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र मनीलाँडरींगमध्ये जेलची हवा खाऊन आले आहेत. भविष्यात पुन्हा ते जेलमध्ये शंभर टक्के हजेरी लावण्याची शक्यता असल्याने तुम्ही कोणाला निवडून देणार, असा सवाल त्यांनी उपस्थितांना करताच ‘शिवसेना-भाजपा महायुती झिंदाबाद’चा जयघोष झाला. सत्तर वर्षांत गरिबी हटविता न आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी न्यायाची भाषा करू नये, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या