नाशिक गारठलेलेच! मानूर 1.1, निफाड 3 तर नाशिक 5.1 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold-wave

सामना प्रतिनिधी, नाशिक

सलग तीन दिवसांपासून नाशिक जिह्यात थंडीची लाट कायम आहे. आज शनिवारी कळवणजवळील मानूर येथे किमान 1.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, येथे दवबिंदू गोठले. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात किमान तापमान 3 अंश, तर नाशिक शहरात 5.1 अंश इतके नीचांकी तापमान होते.

जिह्यातील बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान 3 ते 6 अंशांदरम्यान आहे. गुरुवारी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात एकाच दिवसात किमान तापमान तब्बल नऊ अंशांनी खाली येत नीचांकी 1.8 अंश झाले. त्यामुळे तालुक्यातील बहुतेक शेतकऱयांच्या शेतातील मक्याच्या चाऱयावर, द्राक्षबागांवर, तसेच वाहनांवर दवबिंदू गोठल्याने बर्फाचे थर साचले होते. तालुक्यातील उगाव, शिरवाडे वणी, रौळस, कारसूळ, लोणवाडी, पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, ओझर, सुकेणे, साकोरे, पिंपळस या भागात अतिथंडीने दवबिंदू गोठून द्राक्षबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी कळवण तालुक्यातील मानूर येथे 2.8, तर नाशिक शहरात 5.7 अंश तापमान नोंदविले गेले. शुक्रवारी निफाडचे किमान तापमान 2.2 अंशांनी वाढून 4 अंशांवर गेले. कळवणला पारा 3.4, तर नाशिकला 6.9च्या घरात होता.

शनिवारी निफाडला पारा 3 अंशावर होता, तर नाशिक शहरात 5.1 एवढय़ा नीचांकी तापमानाची नोंद झाली, येथे कमाल तापमान 23.9 अंशांवर होते. थंडीमुळे दिवसभर नाशिककर उबदार कपडय़ात लपेटल्याचे चित्र बघावयास मिळाले.

दवबिंदू गोठले
शनिवारी कळवण तालुक्यातील मानूर येथील शेतकरी धनंजय जाधव यांच्या शेतातील खासगी ऑब्झर्वेटरीत 1.9 अंश तापमान नोंदविले गेले. अतिथंडीमुळे त्यांच्या शेतातील पिकावर दवबिंदू गोठले होते. निफाडपाठोपाठ आता कळवण, मानूर परिसरातही थंडीचा कडाका वाढला आहे. द्राक्षबागांसोबतच थंडीचा फटका रब्बी पिकांनाही बसू लागला आहे. त्यामुळे तापमान नियंत्रित रहावे यासाठी शेतकऱयांनी शेकोटय़ा पेटवून, तसेच रात्रीपासून बागांना पाणी देण्याचे उपाय सुरूच ठेवले आहेत.