नाशिक – लासलगावमध्ये रेल्वे इंजिनाच्या धडकेत 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे रेल्वे इंजिनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लासलगाव – उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लासलगाव रेल्वे स्थानकानजीक सहाच्या सुमारास रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या रेल्वेच्या लाईट दुरुस्ती करणाऱ्या इंजिनाने उडवल्याने चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील आहेत. संतोष भाऊराव केदारे (38), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्मराम अहिरे (40), संतोष सुखदेव शिरसाठ (38) अशी मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व कर्मचारी हे ट्रॅक मेंटेनर आहेत.

पोलीस उप उपनिरीक्षक गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाठ कोठुले लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना रुग्णालयात दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून या चौघांना मृत घोषित केलं. इंजिन चालक, मुख्य अधिकारी यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.