नाथवंशजांच्या कलहामुळे वारकरी नाराज, ​नाथदिंडी मार्गस्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पैठण

नाथवंशजांच्या दोन्ही गटांत कोणताही कलह न होता शांतिब्रह्म एकनाथांची पायी दिंडी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, नाथवंशजांनी केलेल्या मानापमान नाट्यामुळे दुखावलेल्या वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रतिनिधी प्रकाश महाराज जवंजाळ व जिल्हा परिषदेचे अर्थ-बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास राज्यभरातून वारकरी उपस्थित होते.

पैठण शहरातील गोदाकाठावरच्या पंडित गागाभट्ट चौकात ‘भानुदास एकनाथ’ च्या लयबध्द संतनामात वारकरी तल्लीन झाले. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव – तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय’ ‘शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज की जय’चा गगनभेदी उद्घोष झाला. गोदाकाठी जमलेल्या हजारो वारकऱ्यांचा संतनामाचा स्वर टिपेला गेला. नाथभक्तांनी टाळमृदंगाचा ठेका धरला आणि विठोबाचा गजर करत नाथपादुकांचा पालखी सोहळा आषाढीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाला!

पंडित गागाभट्ट चौकात नाथपालखीचा पहिला विसावा ओटा आहे. या परिसरात हा धार्मिक सोहळा रंगला. पैठणकरांनी या पायी दिंडी सोहळ्याला निरोप देण्यासाठी व नाथपादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आज सकाळी संत एकनाथ महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. नाथवाड्यातील (नाथांचा राहता वाडा अर्थात गावातील नाथमंदिर) या पवित्र पादुकांना पालखीत विराजमान करण्यात आले. नंतर नाथवंशज तथा नाथपालखीचे प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी नाथसमाधी मंदिराकडे (बाहेरील नाथमंदिर) मार्गस्थ झाली. तेथे नाथांच्या समाधीची नाथवंशजांनी पूजा केली. परत वाजत गाजत नाथपालखी पहिल्या विसाव्यासाठी पाचपिंपळ परिसरातील पालखी ओट्यावर ठेवण्यात आली. पंडित गागाभट्ट चौकात यासाठी नगर परिषदेच्या वतीने भव्य शामियाना उभारण्यात आला होता. यावेळी महिला-पुरुष भाविकांनी रांगा लावून पालखीतील नाथपादुकांचे दर्शन घेतले. नाथांच्या पालखी सोहळ्यासोबत जिल्हा परिषदेतर्पेâ पिण्याच्या पाण्याचे टँकर व २ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी दिली. पालखीच्या प्रयाणापूर्वी जिल्हा दूध संघाच्या वतीने उपाध्यक्ष नंदलाल काळे यांच्या उपस्थितीत आज दुधाचे ३ हजार पाऊच वारकऱ्यांना वाटण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास भुमरे, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, माजी आमदार संजय वाघचौरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक पुष्पा गव्हाणे, कांचन लेंभे, कृष्णा चौहान, गणेश पवार, सोमनाथ परदेशी, नाथसंस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, प्रतिष्ठित व्यापारी नंदकिशोर लाहोटी, जितू परदेशी, ईश्वर दगडे, नगरसेविका अलका परदेशी, माजी नगराध्यक्षा राखी परदेशी, भिवाजी जायभाये, किशोर चौहान उपस्थित होते.

नागपूरहून येते पायी दिंडी…
नागपूर येथील दामोदर महाराज यांची दिंडी नाथपालखी सोहळ्यात सहभागी झाली आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ही दिंडी एक महिनाअगोदर नागपूरहून पायी निघाली आहे. ४० वारकऱ्यांसह या दिंडीचे आज दुपारी २ वाजता त्यांचे पैठणनगरीत आगमन झाले. अमरावती येथूनसुध्दा भानुदास इसरकर महाराज ३० वारकऱ्यांसह पायी दिंडी घेऊन पैठण येथे आले व नाथदिंडीसोबत सहभागी झाले.

कोळी समाजातर्फे रुग्णवाहिका
महाराष्ट्र महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. नाथपालखीसोबतच ही आरोग्य यंत्रणा दिंडीमार्गावर वारकऱ्यांना सेवा पुरवते. जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे यांनी या अ‍ॅम्ब्युलन्सला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. निवृत्त वैद्यकीय अधिकारी खडके हे वारकऱ्यांवर मोफत उपचार व औषधी वाटप करतात. लक्ष्मण गायकवाड, सपकाळ व पळसकर यांचा या आरोग्य पथकात सहभाग असतो.