
अलीकडच्या काही दिवसांत एशियाटिक सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातच्या पूर्व आणि पश्चिम गिर जंगलात 12 सिंहांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशाच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पात 2 एप्रिलपासून आतापर्यंत 10 वाघांचा मृत्यू झालेला आहे. या वाघ- सिंहामध्ये कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसची (सीडीव्ही) गंभीर लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने 30 हून अधिक सिंहांना पशू काळजी केंद्रात ठेवले आहे. मात्र या प्रकरणी वन विभागाने अद्याप अहवाल दिलेला नाही.
सिंहांचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नाही. गुजरातच्या सिंहांमध्ये सीडीव्ही व्हायरसची लक्षणे आढळल्यानंतर राज्याचे वनमंत्री अर्जुन मोढवाडिया यांनी रविवारी जसाधार पशु काळजी केंद्राला भेट दिली. गेल्या 15 दिवसांत 12 सिंहांचा मृत्यू होऊनही अहवाल जारी झालेला नाही. याबद्दल राज्य सरकार आणि वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत.
परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा
वनमंत्री अर्जुन मोढवाडिया यांनी जामवाला प्राणी काळजी केंद्रातही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. गेल्या तीन दिवसांपासून कोणत्याही सिंहाच्या मृत्यूची बातमी नाही.
प्रकरण उच्च न्यायालयात
मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात 2 एप्रिल 2026 पासून 10 वाघांच्या मृत्यूचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायमूर्ती विवेक जैन आणि न्यायमूर्ती अजय कुमार निरंकारी यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शुक्रवारी प्राथमिक सुनावणीदरम्यान हे प्रकरण गंभीर मानून संबंधित पक्षांकडून उत्तर मागवले.
























































