
अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी केलेल्या हिंदुस्थानींना हद्दपार करण्यावरून मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबने बेकायदेशीर ट्रॅव्हल्स एजंट्सवर कारवाई करत अमृतसरमधील 40 ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केले आहेत. याशिवाय काही आयईएलटीएस केंद्रांचे परवानेही रद्द करण्यात आले असून भविष्यातही अशी कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून कळते.
हिंदुस्थानी नागरिकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटविरोधात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
अमेरिकेने हद्दपार केलेल्या हिंदुस्थानींमध्ये सर्वाधिक आकडा पंजाबचा आहे. 5 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतून अमृतसरमध्ये तीन विमाने आली, ज्यात 333 भारतीयांना पाठवण्यात आले. त्यापैकी सर्वाधिक 126 नागरिक पंजाबमधील होते, असे सूत्रांनी सांगितले.



























































