
झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. या चकमकीत 10 लाख रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार झाला. अमित हांसदा उर्फ आपटन असे ठार झालेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे. अमितचा अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.
रेलापराल जंगल आणि डोंगराळ भागात नक्षलवादी घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती चाईबासाचे एसपी राकेश रंजन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. सुरक्षा दल रेलापाराल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले.
चकमकीदरम्यान नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख नक्षलवादी अमित हंसदा म्हणून झाली. घटनास्थळावरून शस्त्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.