
हातात देशी कट्टा घेऊन रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. रील शूट करताना पतीकडून अचानक ट्रिगर दबला गेला आणि गोळी थेट पत्नीच्या चेहऱ्यावर लागली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गंभीर पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
बिहारच्या वैशाली येथील रहिवासी असलेला मोहम्मद ईसराफिल अंसारी उर्फ राजा हातात देशी कट्टा घेऊन पत्नी गजालीसोबत मोबाईलवर रील बनवत होता. रील शूट करत असतानाच अंसारीच्या हातातील देशी कट्ट्याचा ट्रिगर दाबला गेला. यानंतर कट्ट्यातून सुटलेली गोळी थेट गजालीच्या चेहऱ्यावर लागली. यात गजाली गंभीर जखमी झाली.
पत्नीला रुग्णालयात नेत असतानाच पोलिसांनी रस्त्यातच अंसारीला गाठले आणि ताब्यात घेतले. जखमी पत्नीला उपचारासाठी रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गजालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी घटनेत वापरलेले एक पिस्तूल आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की तो रील बनवत असताना चुकून शस्त्राने गोळी झाडली.


























































