आरसीबीला तगडा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत; 5 टाके पडल्याने पुढील लढतीला मुकण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत विजय रथावर आरूढ झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचा प्रमुख वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) याच्या हाताला दुखापत झाली आहे.

रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या लढतीत सैनीच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याला 5 टाके पडले असून आगामी लढतीत तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. सैनीने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्व लढती खेळल्या असून यात त्याने 5 बळी घेतले आहेत.

प्ले ऑफवर नजर

सध्या बंगळुरूचा संघ 11 लढतीत 7 विजयांसह तिसऱ्या स्थानावर असून प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील 3 पैकी एका लढतीत विजय आवश्यक आहे. बंगळुरूला उद्याच प्ले ऑफ गाठण्याची संधी असून 28 ऑक्टोबरला सायंकाळी विराट कोहलीचा संघ मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. यानंतर सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा विराटसेनेला सामना करायचा आहे.

फिजिओनी दिली माहिती

सैनीच्या दुखापतीबाबत बंगळुरूचे फिजिओ इव्हान स्पिचले यांनी सांगितले की, चेन्नई विरुद्धच्या लढतीत 18 व्या षटकात सैनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. अंगठ्यावर 5 टाके घालण्यात आले आहेत. आज त्याच्या दुखापतीवर नजर ठेवण्यात येईल आणि तो पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल.

तसेच सैनी उजव्या हाताने गोलंदाजी करतो. गोलंदाजीमुळे दुखापत आणखी चिघळू शकते. त्यामुळे याबाबत सध्या काही सांगणे योग्य नाही, मात्र आशा आहे की तो यातून लवकर बरा होईल आणि आगामी लढतीत खेळताना दिसेल, असेही स्पिचले म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या