रोज 40 नवी मुंबईकरांना कुत्र्यांचे चावे, भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण निर्बिजीकरण धीम्या गतीने

स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोणत्याही क्षणी कुत्रा अंगावर धावून येईल व तुमचा चावा घेईल याचा भरवसा राहिलेला नाही. रोज अंदाजे ४० नवी मुंबईकरांचे लचके कुत्रे तोडत असून महिनाभरात एक ते दीड हजार नागरिकांना अॅण्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागत आहे. कुत्र्यांकडून होणारे हल्ल्याचे प्रमाण लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेने २६ आरोग्य केंद्रांमध्ये रेबीजची लस उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान धीम्या गतीने सुरू असलेल्या निर्बिजीकरणाला गती द्यावी आणि शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

नवी मुंबई शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत चालली आहे. त्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असला तरी तो प्रभावीपणे राबवला जात नाही. त्यामुळे कुत्र्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. शहरात दिघ्यापासून बेलापूरपर्यंत दररोज सुमारे ४० जणांचे लचके कुत्रे तोडत आहेत. कुत्र्यांकडून होणारे हल्ले वाढल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने महापालिका रुग्णालयांसह विविध आरोग्य केंद्रात अॅण्टी रेबीज लस उपलब्ध केली आहे. वर्षभरात सुमारे १५ ते १६ हजार नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

पनवेलमध्ये १५ रेबीज क्लिनिक

नवी मुंबई महापालिका क्षेत्राच्या तुलनेत पनवेल महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या कमी आहे. पनवेलमध्ये वर्षभरात सात हजार नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने २६ आरोग्य केंद्रापैकी १५ आरोग्य केंद्रात रेबीज क्लिनिक सुरू केले आहे.

दुचाकीस्वारांना मोठा त्रास

भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. रात्री दहानंतर विविध चौकात आणि रस्त्यांवर उभे असलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या दुचाकींचा पाठलाग करीत आहेत. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.