
आम्ही नाना पेठेतील भाई आहोत’ असे म्हणत १५ ते २० जणांच्या टोळक्याने सलूनमध्ये शिरून राडा घालत तरुणावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. या टोळक्याने सलूनची तोडफोड केली. ही घटना शहरातील मध्यवर्ती नवी पेठेतील हत्ती गणपती मंदिरासमोर घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून १२ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
सनी यांचे नवी पेठेत सलून आणि टॅटूचे दुकान आहे. २१ फेब्रुवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्याच्या दुकानात शिरले. कुठे आहे तो असे ओरडत त्यांनी सनीचा आतेभाऊ आदर्श मिसाळ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील काचा फोडून नुकसान केले.
याप्रकरणी ऋषिकेश जालिंदर कांबळे (वय २१), प्रतीक युवराज शिंदे (वय १८) यश संजय चव्हाण (वय २०), स्वराज निलेजय वाडेकर (वय २०) वैभव नितीन शहापूरकर (वय २०) आणि देविदास बाळासाहेब गालफाडे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सनी विनोद महापुरे (वय १९, रा. फाले नगर, कात्रज ) यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे अधिक तपास करीत आहेत.




























































