निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी, आज कोअर कमिटीची बैठक

54
ncp president sharad-pawar

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाअंतर्गत बदल करण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज 1 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या पदाधिकाऱयांना बाजूला करून नवीन चेहऱयांना पक्षात संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा उमेदवार फक्त एका जागेवर विजयी झाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 11 ते 12 जागांची अपेक्षा होती, पण फक्त 5 जागांवर उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेतल्या, पण अपेक्षित यश मिळाले नाही.

नवीन चेहऱयांना संधी
आगामी विधानसभा निवडणुकीला सामारे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन चेहऱयांना संधी देण्यात येणार आहे. ताज्या दमाच्या नवीन चेहऱयांना पक्षात पुढे आणण्याची योजना पक्षनेतृत्वाने आखली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

पराभवाची समीक्षा होणार
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या महायुतीपुढे पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची संयुक्त बैठक चार दिवसांपूर्वी आयोजित केली होती. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्याबरोबरच महायुतीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर 1 जून रोजी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10 वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शरद पवार स्वतः आपल्या पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्याबरोबरच पराभवामागील कारणांचा शोध घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पक्षाची सर्वसाधारण बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पवार स्वतः लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचेही राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या