1 कोटी 80 लाखांच्या कृतज्ञता कोषातून शेतकऱयांसाठी मदत- शरद पवार यांची घोषणा

698

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना 1 कोटी 80 लाख रुपयांचा कृतज्ञता कोष प्रदान करण्यात आला. या निधीचा उपयोग गरजू व संकटात सापडलेल्या शेतकऱयांसाठी करण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या मुलाच्या आईच्या नावावर बँकेत 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘बळीराजा कृतज्ञता दिन सन्मान’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आपल्या आईची आठवण सांगताना शरद पवार म्हणाले, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहत नाही; परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस 13 डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा जन्मदिवस 11 डिसेंबर आहे याची आठवण शरद पवार यांनी सांगितली. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवले. 1936 साली ती लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी या वेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या