
गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली छाप उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा शरद पवार यांचा मोठा राजकीय प्रवास आहे. 12 डिसेंबर, 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला आणि आज त्यांनी वयाची 79 वर्ष पूर्ण करत 80 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्याबाबत खास गोष्टी जाणून घेऊया…
1. शारदाबाई गोविंदराव पवार या शरद पवार यांच्या मातोश्री. शरद पवार आणि त्यांच्या मातोश्रींचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला असतो. पवारांच्या मातोश्री शेतकरी कामगार पक्षात सक्रिय होत्या, शेतकरी कामगार पक्षाकडून त्या जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य राहिल्या.
2. शरद पवार यांचे मोठे बंधू वसंतराव पवार यांनी देखील शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभेला नशीब आजमावून पाहिले. पण या निवडणुकीत शरद पवार यांनी मात्र काँग्रेस पक्षाचा प्रचार केला होता.

3. यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच शरद पवार यांची वाटचाल झाली. पुढे यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. यशवंतराव चव्हाण शरद पवार यांना आपले मानसपुत्र मानत.
4. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात ‘मुलगाच हवा’ अशी मानसिकता समाजाची होती. 1969मध्ये शरद पवार यांना मुलगी झाली.

5. राजकारणासोबतच शरद पवार यांनी खेळाचेही मैदान गाजवली आहेत. शरद पवार BCCI देखील अध्यक्ष होते. त्यानंतर शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष राहिले आहेत.
6. सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली.
7. किल्लारी इथे झालेल्या भूकंपानंतर शरद पवार यांनी त्या परीस्थितीमध्ये तब्बल तीन महिने त्या ठिकाणी स्वतः तळ ठोकून तेथील पुनर्वसन योग्य प्रकारे केले.

8. शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोद चा प्रयोग केला. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले. 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले.
9. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मित्रत्वाचे नाते होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन धुरंदरांचे राजकीय विरोधाचे आणि वैयक्तीक आयुष्यातील मैत्रीचे अनेक किस्से आहेत.

10. शरद पवार आजपर्यंत एकही निवडणूक हरली नाही. 1984 सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता.
11. नरसिंह राव सरकार मध्ये शरद पवार संरक्षणमंत्री होते. पण 1993 साली नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी 6 मार्च 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.



























































