
भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडय़ांच्या ताफ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चपला आणि बांगडय़ा फेकत भाजप कारभाराचा निषेध केला. तत्पूर्वी, भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. वातावरण तणावपूर्ण झाल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तात उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. तर भाजपने पाच वर्षांत महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली. पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्याचे ठरले. दुपारी चार वाजता याठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू लागले. त्यांनी भाजपच्या निषेधार्थ आंदोलन सुरू कsले. त्याचवेळी भाजप कार्यकर्तेदेखील कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते. मात्र, यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगविले. परिस्थिती नियंत्रणात राहावी, याकरिता पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पावणेपाचच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. या वेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या वाहनांवर चपला फेकल्या. महिलांनी बांगडय़ा भिरकाविल्या.

































































