‘एनसीव्हीटी’चे रखडलेले निकाल जाहीर

409

मे महिन्यात एनसीव्हीटी परीक्षा दिलेल्या बारा हजार विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापपर्यंत रखडले होते, परंतु युवा सेनेच्या दणक्याने हे निकाल जाहीर होण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी एकाच दिवशी पाच हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांचे निकालही लवकरच जाहीर होतील.

आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एनसीव्हीटी अभ्यासक्रमाची परीक्षा दिली जाते. त्या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. परंतु यंदा मे महिन्यात परीक्षा देऊनही 90 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल डिसेंबरपर्यंत जाहीर न झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त होते. त्यांनी युवासेनेशी संपर्क साधला.

युवासेनेचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी निकाल रखडण्यामागची कारणे जाणून घेतली. त्यानंतर साटम यांच्यासह युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, मुलुंड येथील उपविभागप्रमुख सुनील गारे यांनी राज्याचे कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहा यांची भेट घेतली आणि ऑनलाइन पोर्टल प्रक्रियेतील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

आयुक्त कुशवाहा यांनी दिल्ली येथील संबंधित कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून विद्यार्थ्यांचे रखडलेले निकाल मागवून घेतले. पाच हजार विद्यार्थ्यांचे निकाल आले असून इतरांचे लवकरच येतील असे त्यांनी सांगितले. युवासेनेशी चर्चा करून पोर्टल प्रक्रियेत सुधारणा करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या