Paris Olympics 2024 मध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावत सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक पटकवण्याचा किमया साधली. नीरज चोप्रा सुवर्ण पदक पटकवण्यात अपयशी ठरला असला तरी, रौप्य पदक पटकावल्यामुळे त्याच्या ब्रॅंड व्हॅल्यु, नेट वर्थ आणि एंडोर्समेंट पोर्टफोलिओमध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, नीरज चोप्राकडे सध्या 24 ब्रॅड्सची प्रमोशन करण्याची जबाबदारी आहे. मात्र रौप्य पदक पटकावल्यानंतर त्यामध्ये आणखी 6 ते 8 ब्रॅंड्सची वाढ होण्याची शक्यता आहे. नीरज चोप्रा सध्या त्याच्या सर्व एंडोर्समेंटसाठी वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये घेतो. मात्र आता त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जर त्याने 6 ते 8 नवीन ब्रॅंड्सशी करार केला, तर तो हिंदुस्थानातील अनेक क्रिकेटपटूंना मागे टाकेल.
सध्या नीरज चोप्राची ब्रॅंड व्हॅल्यू 248 कोटींपर्यंत आहे. मात्र या वर्षाच्या अखेरीस त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जर त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 50 टक्क्यांनी वाढली तर ती 377 कोटी रुपयांपर्यंच पोहचू शकते.