परळच्या गर्दीवर उपाय! नव्या टर्मिनसमधून सुटणार 16 परळ लोकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दुसरे दादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळ टर्मिनसचे काम जोरदार सुरू असून या स्थानकात टर्मिनल प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येथे 20 आणि 27 जानेवारी रोजी दोन मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. परळ येथे होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सुमारे कल्याणच्या दिशेने 16 परळ लोकल सोडण्याची योजना आहे.

दादर स्थानकाप्रमाणे परळमध्येही प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. अनेक महत्त्वाची रुग्णालये आणि इंडिया बुल्ससारख्या गगनचुंबी इमारती, अनेक कॉर्पोरेट कार्यालये यामुळे परळ स्थानकावरील गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे परळ टर्मिनसची योजना रेल्वे बोर्डाने मंजूर केली होती. एल्फिन्स्टन रोडच्या दुर्घटनेनंतर परळ टर्मिनसचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळ टर्मिनसचे उरलेले काम जानेवारीअखेरपर्यंत संपवून त्याचे उद्घाटन आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच करण्याचा प्रयत्न आहे. परळ टर्मिनसचे काम 2015 साली पूर्ण केले जाणार होते. टर्मिनसमधील एक फलाट जून 2018मध्ये प्रवाशांच्या सेवेत आला आहे. तेथे लिफ्ट आणि सरकता जिनाही सुरू करण्यात आला आहे. पूर्वीचा एक नंबर फलाट बंद करून तेथेच टर्मिनसचे अंतिम काम सुरू आहे.