शेअर मार्केटमध्ये व्यवसायाच्या संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> प्रवीण धोपट, आर्थिक सल्लागार

पूर्वीपासूनच  अपवाद वगळता स्टॉक मार्केट म्हणजे आपलं काम नाही, आपल्याला ते जमणार नाही, त्यासाठी खूप पैसा लागतो, मार्केट म्हणजे सट्टा, मार्केट म्हणजे जुगार, मार्केट म्हणजे पैसे बुडणारच अशा गृहितकांवर  मराठी माणूस मार्केटपासून  दूर पळत होता. ‘‘गडय़ा आपली नोकरी बरी’’ म्हणत दुसऱयांकडे राबत होता. कोविड काळात त्यातले बरेचसे लोक स्टॉक मार्केटकडे  आस्थेवाईकपणे पाहू लागले. चुकत चुकत का होईना, मार्केटमधले  व्यवहार शिकायला लागले.

सप्टेंबर 2021च्या सेबीच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात डिमॅट अकाऊंट होल्डरची संख्या 45 करोड आहे. यातली बहुसंख्य अकाऊंट ही कोविडच्या काळात उघडली गेली आहेत.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने  प्रत्येकाच्या मनात भीती, अस्थिरता, चिंता आणि संशयाची बीजं पेरली.  अनेकांच्या व्यवसायांवर, उद्योग आणि नोकऱयांवर गदा आणली. कित्येक लहान आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना भांडवल, मजूर आणि मार्केटच्या  अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यातून काही व्यवसाय कायमचे बंद झाले. एप्रिल-जून 2020 तिमाहीतला हिंदुस्थानचा जीडीपी 23.9 टक्क्यांवरून जुलै- सप्टेंबरच्या तिमाहीत 7.7 टक्क्यांपर्यंत खाली आला, तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या निरीक्षणानुसार एप्रिल  2020 मध्ये बेकारांची संख्या 27 टक्क्यांपर्यंत पोहोचली.

 कॉर्पोरेट जगात ‘वर्क फ्रॉम होम’चं कल्चर उदयाला येत होतं, ते या काळात अधिक विस्तारलं, तर ज्यांचे उत्पन्नाचे इतर पर्याय खुंटले होते, त्यांनी घरबसल्या काही काम करता येईल का याचा शोध सुरू केला.   सर्व संपलंय असं वाटत असतानाच काही काळानंतर जग सावरायला लागलं. जुन्याच गोष्टींकडे नव्या नजरेनं पाहू लागलं. संकटातही संधी शोधू लागलं. यातलीच एक महत्त्वाची संधी म्हणजे स्टॉक मार्केट. हा व्यवसाय अस्थिर आहे. भूतकाळातील अनुभवावरून भविष्यकाळातील अंदाज बांधता येत नाही. तरीही तो आज देशातल्या 24 करोड लोकांचा व्यवसाय आहे. काही पथ्यं, नियम आणि शिस्त पाळली तर हा व्यवसाय उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे.

हे नियम पाळायलाच हवेत…

 आपल्याकडे गुंतवणुकीसाठी योग्य स्ट्रटेजी असायला हवी. ज्यामध्ये गुंतवणुकीमागचा हेतू आणि आपण किती जोखीम पत्करू शकतो याचा समावेश होतो.

 आपण वापरत असलेली रक्कम डायव्हर्सिफाय करणे आवश्यक आहे. ज्यामुळे जोखीम आपोआपच कमी होते.

 आपण ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, त्या कंपन्यांचे फंडामेंटल
अनॅलिसीस करीत राहायला हवे.

 स्टॉक मार्केटमध्ये काम करण्यासाठी केवळ पैसे असून भागत नाही तर तुमच्याकडे सबुरी आणि शिस्त असायला हवी. मार्केट चढ-उतारांचा झुला असतो, त्यात आपली मनःशांती ढळू देऊ नये.

 आपल्या पैशांवर आपले लक्ष असावे. शेअर्स कधी विकत घ्यावे, किती काळ होल्ड करावे आणि कधी विकावे याचे निर्णय योग्य वेळी घेणे आवश्यक असते.