
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे, आणि या महत्वाच्या दिवशीच एका जोडप्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. अमेरिकेतील साउथ कॅरोलिनामध्ये एक दु;खद घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच तासांतच नवदाम्पत्यावर काळाने घाला घातला. एक नवविवाहीत जोडपे त्यांच्याच लग्नाच्या रिसेप्शनला जात असताना भयंकर अपघात झाला. दारूच्या नशेत सुसाट गाडी चालविणाऱ्या मुलीने समोरून गाडीला धडक दिली. यामध्ये नववधू जागीच ठार झाली तर नवरा मुलगा गंभीर जखमी आहे.
30 एप्रिल रोजी या जोडप्याचे लग्न झाले. त्यानंतर लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम गोल्फ कोर्टवर ठेवण्यात आला होता. गोल्फ कोर्टवर जात असताना दारू पिऊन तर्राट असलेल्या मुलीने समोरच्या दिशेने येऊन नवविवाहितांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की गाडी लांबवर घसटत गेली. या भयंकर अपघातामध्ये 34 वर्षीय नववधू सामंथा हचिन्सन जागीच ठार झाली तर नवरा मुलगा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.




























































