
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला अंतिम झाला असून 50:50 टक्के जागा लढविल्या जाणार आहेत, असे महाराष्ट्राचे अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल मात्र युतीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वन विभागाच्या वतीने राज्यभर 33 कोटी वृक्ष लागवड करण्याच्या मोहिमेचा मराठवाडा विभागाचा आढावा घेण्यासाठी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज, सोमवारी शहरात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतूल सावे, बसवराज मंगरूळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतान सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना-भाजपा युती राज्यात भक्कमपणे वाटचाल करीत आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागा वाटपाचा फाम्र्युला अंतिम झाला आहे, विधानसभेच्या 50:50 टक्के जागा लढविल्या जाणार आहेत राज्यात वन क्षेत्र वाढत आहे, त्यामुळे वन्य प्राणी, वाघ वाढले आहेत, वन मंत्र्यांच्या या दाव्याचा संदर्भ घेऊन युतीचे चार वाघ घायाळ झाले आहेत, त्यासाठी भाजपाची बंदुक वापरली गेली असा आरोप होतो, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता वन मंत्री मुनगंटीवार म्हणाले, घायाळ वाघांचे लवकरच पुनर्वसन केले जाईल, ते नव्या दमाने काम करू शकतील, असा आपणास विश्वास आहे, वाघ घायाळ करण्यासाठी भाजपाचे बंदुक वापरली या आरोपाचे खंडन करीत ते म्हणाले, मुळात ती बंदुक आमची नाही, वापरणाराही आमचा नाही, आमच्या पक्षात असे कोणी नाहीत, तुमच्या म्हणण्यानुसार तो बंदुक वापरणारा आमचा असेल तर तो पक्षात असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वन विभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवड ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यात मनपा, अ वर्ग नगरपालिका क्षेत्रामध्ये अटल वन योजना राबविली जाणार असून प्रायोगिक तत्त्वावर ठाणे आणि पुणे महापालिका क्षेत्रात राबविली जात आहे, अन्य भागातही राबविली जाणार आहे, असे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले. अटल वन योजना ही जपानच्या धरतीवर राबविण्यात येणार आहे, यानुसार एक एकर क्षेत्रावर साडेबारा हजार वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.




























































