
सुनंदा पुष्कर गूढमृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर यांच्यावर आरोप निश्चित करावेत की नाहीत याबाबतचा निकाल दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाने राखून ठेवला आहे. त्याबाबतचा निकाल हे न्यायालय येत्या 29 एप्रिलला सुनावणार आहे.सरकारी पक्षाने या प्रकरणात थरूर यांच्यावर आयपीसी 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे ) आणि 498 ए (हुंडय़ासाठी छळ) या पोलिसी कलमान्वये आरोप निश्चित करावेत अशी मागणी केली आहे. मात्र हे आरोप सिद्ध करण्यासाठीचा एकही पुरावा पोलिसांना मिळाला नसल्याने थरूर यांना निर्दोष मुक्त करावे अशी मागणी थरूर यांचे वकील विकास पाहवा यांनी केली आहे.
दिल्लीच्या न्यायालयात 26 मार्चला झालेल्या सुनावणीत पत्नी सुनंदा पुष्करचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारानेच सुनंदा आत्महत्या करूच शकत नाही असा दावा न्यायालयासमोर केल्याचे थरूर यांनी सांगितले आहे. असे असेल तर त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपात कसे अडकवता असा सवाल थरूर यांचे वकील पाहवा यांनी केला.न्यायमूर्ती गीतांजली गोयल यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि प्रतिवादी थरूर यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी या प्रकरणाचा निकाल 29 एप्रिलपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




























































