सावंतवाडी, कणकवली ते गोवा, नीतेश राणे यांचे कोकण दर्शन

संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे आणि पीए राकेश परब यांना समोरासमोर बसवून कणकवली पोलिसांनी तब्बल पाच तास कसून चौकशी केली. त्यानंतर राणे कुठे लपले होते त्याचे कनेक्शन शोधण्यासाठी त्यांना गोव्यात घेऊन गेले. गोव्यातील एका हॉटेलात चौकशी झाल्याचे समजते. 4 फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आमदार नीतेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते बुधवारी कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले. सुरुवातीला त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांची रवानगी सावंतवाडी पोलीस कोठडीत करण्यात आली. गुरुवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यात पीए राकेश परब आणि राणे यांची पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी पाच तास चौकशी केली.

कट पुण्यात शिजला

हल्ल्याचा सगळा कट पुण्यात शिजला आहे. त्यामुळे राणे यांना पुण्यालाही घेऊन जावे लागेल असे एका अधिकाऱयाने सांगितले.