माझ्या हिंमतीला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही, गडकरी पुन्हा बोलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nitin-gadkari

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही दिवसात वेगवेगळी वक्तव्य करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. नुकतेच त्यांनी आधी घर, मूल आणि कुटुंब सांभाळा असे वक्तव्य केले होते. यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वक्तव्याची प्रसारमाध्यमात आलेली बातमी ट्वीट करत गडकरींच्या हिंमतीची प्रशंसा केली होती. यासह त्यांनी गडकरींना काही प्रश्नही विचारले होते.

राहुल गांधींच्या या ट्वीटचा नितीन गडकरी यांनी चांगलाच समाचार घेतला असून एकामागोमाग एक तीन ट्वीट करत त्यांनी राहुल यांच्यासह काँग्रेसवरही निशाणा साधला. माझ्या हिंमतीला तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, असे गडकरी म्हणाले. तसेच आपल्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही भाजपवर टीका करण्यासाठी त्यांना मीडियाने मसाला लावून प्रसिद्ध केलेल्या बातमीचा आधार घ्यावा लागतो, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. तसेच मोदी पंतप्रधान झाल्याचे तुमच्यासह काही लोकांना सहन झाले नसून त्यामुळेच देशात असहिष्णुता पसरली असल्याची आव उठवली जात आहे, असेही गडकरी म्हणाले.

काँग्रेस आणि आमच्या डीएनएमध्ये अंतर असून आम्ही लोकशाही आणि संविधानिक संस्थांवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे डाव उलटून पडत आहेत. मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असेही गडकरी म्हणाले. तसेच भविष्यात तुम्ही समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागाल अशी अपेक्षा करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.