
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रत्येक श्वास घेताना मुंबईकरांना आता विचार करावा लागणार आहे. प्रत्येक श्वासागणिक मुंबईकर सध्या नायट्रोजन डायऑक्साईड आपल्या शरीरात शोषून घेत आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईच्या हवेतील नायड्रोजन डायऑक्साईड या विषारी वायूचे प्रमाण वाढले आहे. वाहनांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या या वायूमुळे श्वासोच्छ्वासाचे, घशाचे, दम्याचे आजार होऊ शकतात. वरळी आणि अंधेरी परिसरात या वायूने कमाल पातळी गाठली असल्याचे पालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक वार्षिक अहवालात म्हटले आहे.
पालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे दररोज अंधेरी, भांडुप, वरळी, वडाळा, खार अशा पाच ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासली जाते. तसेच डंपिंग ग्राऊंडच्या परिसरातही हवेची तपासणी केली जाते. गेल्या वर्षभरात दररोज केलेल्या निरीक्षणात नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याचे आढळून आले आहे, तर हवेची गुणवत्ता ज्यावरून ठरवली जाते तो ‘एसपीएम’ इंडेक्सही वाढला आहे.
नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले
हवेतील कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचे प्रमाण दररोज तपासले जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या प्रमाणापेक्षा नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आढळून आले आहे. सोडियम डायऑक्साईड आणि अमोनिया या वायूंचेही प्रमाण वाढले आहे. मात्र ते मर्यादेच्या आत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
कुठून येतो नायट्रोजन डायऑक्साईड
वाहनांमधून सोडला जाणारा धूर, कारखाने, इमारत बांधकाम, औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषण वाढते आहे. त्यातून विशेषतः नायट्रोजन डायऑक्साईड हा विषारी वायू बाहेर पडत असतो.
श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास
ज्या व्यक्तींना आधीच दमा, खोकला असे त्रास आहेत अशा व्यक्तींना नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यावर सर्वात आधी या हवाबदलाचा त्रास होत असतो.
नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण असे वाढले
प्रत्यक्षात हे प्रमाण घनमीटरला 50 मिलीग्रॅम असणे आवश्यक आहे.
2015-16 2016-17 2017-18
वरळी 34 – 76
खार 84 71 62
अंधेरी 63 73 73
भांडुप 41 47 62



























































