बलात्काराचा आरोपी असलेल्या नित्यानंदला पार्टीला बोलवलं, ब्रिटीश खासदाराचं निमंत्रण वादात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्काराचा आरोप असलेला आणि सध्या फरार असलेला स्वामी नित्यानंद याला ब्रिटीश खासदारांनी दिवाळी पार्टीला निमंत्रित केल्याने वाद निर्माण झाला आहे. ऑब्जर्व्हर या वृत्तसंस्थेने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

हे दोन्ही खासदार कन्जर्व्हेटिव्ह पक्षाचे आहेत. त्यांची नावं बॉब ब्लॅकमॅन आणि रामी रेंजर असं आहे. या दोघांनी नित्यानंदला दिवाळी पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. असं आमंत्रण मिळाल्याचं नित्यानंदच्या संघटनेतर्फे जारी करण्यात आलं होतं. ब्रिटनच्या हिंदू मंचातर्फे आयोजित दिवाळीच्या कार्यक्रमासाठी नित्यानंदला आमंत्रण देण्यात आलं होतं. हे आमंत्रण योग्य असल्याचं अनेकांना वाटत आहे, हे त्याहूनही अधिक धक्कादायक असल्याचं ऑब्जर्व्हरच्या वार्ताहराचं म्हणणं आहे. ही महिला वार्ताहर आपल्या संस्थेतर्फे या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

या पार्टीत नित्यानंदचा ब्रिटीश प्रतिनिधी आत्मदया सहभागी झाला होता. खुद्द नित्यानंद या कार्यक्रमात सहभागी झाला नव्हता. 2019पासून तो हिंदुस्थान सरकारचा फरार आरोपी आहे. त्याच्यावर अनेक मुलांचं अपहरण करणं आणि आपल्या शिष्यांवर बलात्कार केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याने हिंदुस्थानमधून पळ काढून कैलासा गणतंत्र नावाचा स्वतंत्र देश स्थापन केला असून ज्या बेटावर हा देश आहे, तिथे आपली मालकी असल्याचं जाहीर केलं आहे.