
राज्य सरकारचे शिष्टमंडळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यातील चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी 10 वाजता रणरणत्या उन्हात उपोषणाला बसण्यावर आपण ठाम असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे सरकारनेच सांगितले आहे, ती यादी जाहीर करा आणि त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही त्यांनी केली. तर चर्चेसाठी आलेले मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आम्ही मनोज जरांगे यांचे म्हणणे ऐकून घेतले असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नंतर पुन्हा जरांगे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे आंतरवाली सराटीत आले. आंतरवालीत उभयतांमध्ये दोन तास चर्चा झाली. या वेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडून कशा पद्धतीने मराठा समाजाची फसवणूक करण्यात येत आहे याचा पाढाच शिष्टमंडळासमोर वाचला.
राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती सरकारनेच दिली आहे. जर एवढय़ा नोंदी सापडल्या असतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र का देण्यात येत नाही? हे प्रमाणपत्र देण्यात अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनले असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयात हे प्रमाणपत्र वाटप करू नका असे आदेश आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
सरकारची भूमिका प्रामाणिक
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेला आरोप विखे–पाटील यांनी खोडून काढला. प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री कसा देतील, असे ते म्हणाले. राज्यात आतापर्यंत 39 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत, त्याची यादी आम्ही देतो. मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. जरांगे यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आंदोलनाचा फेरविचार करण्याची विनंती त्यांनी केली.
स्वतंत्र मराठा मंत्रालय सुरू करा
मराठा समाजासाठी स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी आज केली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱया पोलिसांवरही गुन्हे दाखल करा अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. हैदराबाद, साताऱयासह इतर गॅझेट लागू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मीही आंदोलन मागे घेतो, पण आमची फसवणूक करू नका, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला.


























































