पुण्यातील मार्केटयार्डात ओळखपत्राशिवाय ‘नो एन्ट्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पादुर्भाव काळात श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील भाजीपाला बाजारातील गर्दीला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता ओळखपत्राशिवाय कोणालाही मार्केट यार्डात ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलिसांची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यामध्ये ओळखपत्राशिवाय बाजारआवारात कोणालाच प्रवेश दिला जाणार नाही. त्याशिवाय किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित बैठकीला सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ उपस्थित होते. मार्केट यार्डातील गर्दीला आवार घालण्यासाठी शेतीमालाची किरकोळ विक्री बंद करण्यात येणार आहे. ओळखपत्राशिवाय बाजारात कोणालाच प्रवेश देण्यात येणार नाही. अडते, व्यापारी, कामगार, हमाल, तोलणार, टेम्पोचालक, घाऊक खरेदीदार आदींना ओळखपत्र देण्यात येणार आहे.

मार्केटयार्डातील वाहनतळावर ओळखपत्र दाखविल्याशिवाय वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. बाजारआवारातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील प्रवेशद्वार क्रमांक सातमधून टेम्पोचालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशद्वार क्रमांक एकमधून त्यांना बाहेर पडता येणार आहे. शनिवारी आणि रविवारी मार्केटयार्ड पूर्णपणे बंद राहणार आहे.

लॉकडाउनमध्ये मार्केटयार्डातील विविध विभाग दिवसाआड पद्धतीने सुरू ठेवण्यात येत होता. सोमवारी बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने बाजारात फक्त ओळखपत्र असणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. सोमवारी पहाटे मार्केटयार्डातील शिवनेरी रस्ता शेतीमाल वगळता अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मार्केटयार्डातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे 15 कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यातील 30 कर्मचारी बंदोबस्तास ठेवण्यात येणार आहेत. मार्केटयार्डातील सुरक्षारक्षक तसेच कर्मचारी बंदोबस्तास साहाय्य करणार आहेत. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असल्याने भुसार बाजारात अन्नधान्य घेऊन येणारे ट्रक रांगेत लावण्यात येणार आहे. सोमवारी दुपारनंतर त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बाजार समितीकडून उपायोजना करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.