
सामना प्रतिनिधी । पुणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘दूध बंद’ आंदोलनाचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागले असून, शहरात दुधाची टंचाई जाणवू लागली आहे. चितळे डेअरीचे संकलन बंद असल्यामुळे गुरुवारी चितळे डेअरीकडून दूधविक्री बंद ठेवली आहे. त्याबरोबर इतर दूध संघाचा पुरवठाही घटला आहे. त्यामुळे पुणेकरांवर दुधासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.
शहरात काही ठिकाणी आंदोलनाची झळ बसत असली तरी ग्रामीण भागात आंदोलन चांगलेच पेटले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह नगर, सोलापूर आदी भागांतून शहराला होणारा दूधपुरवठा खंडित झाला आहे. अत्यल्प संकलन होणाऱ्या दुधावर प्रक्रिया करून शहरांना पुरवठा करणे दूध संघाना अशक्य होत आहे. परिणामी पुणे शहराला सुमारे पंचवीस ते तीस टक्के दूधपुरवठा करणाऱ्या चितळे डेअरीने दूधविक्री बंद ठेवली आहे. तर, कात्रज दूध संघाचे संकलन निम्म्यावर आले असून पुरवठाही मोठ्या प्रमाणात घटला आहे. नगर, सोलापूर भागातून दूधपुरवठा होणार नसल्याचे संबंधित दूध संघ विक्रेत्यांना सांगत आहेत. त्यामुळे उद्यापासून पुणेकरांना दुधासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे.
याबाबत कात्रज संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, कात्रज दूध संघाचे संकलन निम्म्यावर आले असून दिवसेंदिवस त्यात घट होत चालली आहे. त्यामुळे गुरुवारी शहराला केला जाणारा दूधपुरवठा हा अत्यल्प प्रमाणात होईल.
चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे म्हणाले, बुधवारी २५ ते ३० टक्के दूध संकलन झाले. मात्र, एवढ्या कमी दुधावर प्रक्रिया करून ते पुणे शहरात पाठविणे शक्य नाही. त्यामुळे गुरुवारी दूधविक्री बंद ठेवली आहे.
गणेश पेठ दूध बाजारात दुधाला तेजी
गणेश पेठ दूध बाजारात आंदोलनाच्या काळात दुधाची आवक घटली नसली तरी टंचाईमुळे येथील दुधाच्या दरात वाढ झाली आहे. १८ लीटर घागरीला इतर वेळी ९०० रुपये मिळणारा भाव आंदोलन काळात १०२० रुपयांवर पोहचला. आज प्रति घागरीमागे १०० ते १२० रुपयांनी वाढ झाल्याचे, गणेश पेठ दूध खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे यांनी दिली.





























































