आचरेत पेरण्या कुजल्या, महिनाभर पाण्याचा निचराच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

पाणी वाहून जाणारा मार्ग गाळाने भरल्याने आचरा डोंगरे वाडी येथील शेतमळ्यात पावसाने साचलेल्या पाण्याचा निचराच होत नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. शेतीची कामे खोळंबली असून पेरलेली बियाणेही कुजल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

दरम्यान प्रशासनाने याची तातडीने दखल घेत पाणी वाहून जाणाऱ्या मार्गावरील गाळ तातडीने उपसा करून मार्ग मोकळा करावा अशी मागणी डोंगरे वाडी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

आचरा डोंगरे वाडी येथील विस्तिर्ण पसरलेल्या शेत मळ्यात पिकणाऱ्या भात पिकांवर येथील बहुतांशी कुटूंबाची आर्थिक घडी बसली आहे. मात्र भात बियाणे पेरलेल्या शेतीत साचलेल्या सुमारे दिडदोन फूट उंचीच्या पाण्याचा निचराच होत नाही अशी स्थिती आहे.

एकीकडे ओढ्याच्या पाण्यासोबत शेतात घुसणारा प्लॅस्टीक कचरा, दुसरया बाजूने खाजन भागाकडून येणारे भरतीचे पाणी आणि पावसाचे पाणी असा तिहेरी मारा सुरू आहे. कांदळवनही वाढले असून अडकून पडलेल्या गाळाने खाडीच्या दिशेने पाणी वाहून जाण्याचा भाग उंच बनला आहे. तर ग्रामस्थांना येण्या जाण्याच्या मार्गासाठी कॉंक्रिट मध्ये बसवलेल्या सिमेंट पाईपची उंचीही जास्त झाल्याने पाणी वाहून जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

येथील ग्रामस्थ नामदेव देसाई, संजय परब, एकनाथ परब, सुजीत कोकम व वाडीतील ग्रामस्थ एकत्र येत जेसीबी च्या सहाय्याने गाळाचा भाग रूंद करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नाही. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.

होडी चालविण्याचा आनंद
शेतात साचलेल्या पाण्यात नौका विहार करण्याचा आनंद येथील मुले व युवा वर्ग घेत आहेत. काही जण मासे पकडतानाही दिसून येत आहेत.