
सामना प्रतिनिधी । पारनेर
वृक्षारोपणाचा केवळ देखावा न करता लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाचे संवर्धन करून पर्यावरण संतुलनासाठी हातभार लावण्याची प्रत्येक नागरिकाने जबाबदारी उचलण्याचे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले.
पंचायत समितीचे सदस्य गणेश शेळके यांच्या पुढाकारातुन वाडेगव्हाण गणातील मावळेवाडी येथे औटी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. गणेश शेळके, सरपंच उदय कुरकुटे, भाऊसाहेब भोगाडे, गणेश पठारे, जयसिंग धोत्रे, अनिल कर्डीले यांच्यासह वाडेगव्हाण गणातील विविध गावांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना औटी म्हणाले, बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन ढासळले असून त्यामुळे अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दृश्य परिणाम दिसून येत नाहीत. वृक्षसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरीकाने त्यात योगदान देऊन लावलेल्या प्रत्येक झाडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याच शिवारात आडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील नागरिकांनी लोकसहभागातून या कामांमध्ये योगदान देण्याचे आवाहन औटी यांनी केले.




























































