मराठा मागास असल्याचे कुणबी, ओबीसी, इतर मागासवर्गीयांनाही मान्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात कुणबी, ओबीसी आणि इतर मागासवर्गीयांनीही मराठा समाज मागास असल्याचे मान्य केले आहे. मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागासलेपणाला आयोगाने 25 पैकी 21 गुण दिले आहेत असा युक्तिवाद आज राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.

मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली. मराठा समाज मागास आहे का? खंडपीठाने विचारलेल्या या प्रश्नावर साखरे यांनी सांगितले की सर्व्हेदरम्यान कुणबी समाजातील 89 टक्के, ओबीसी समाजातील 90 टक्के, इतर मागासवर्गातील 89 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिले आहे.

सर्वेक्षण करून विविध संस्थांनी जो तपशील आयोगाकडे दिला होता त्याची तीन वर्गांमध्ये छाननी करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे तीन गट आयोगाने तयार केले. या गटांना अनुक्रमे 10, 8 आणि 7 असे एकूण 25 गुण दिले होते. या गुणांमध्ये आलेल्या माहितीची वर्गवारी करण्यात आली व त्यानुसार आयोगाने मराठा समाजाला सामाजिक गटात 7.5, शैक्षणिक गटात 8 तर आर्थिक गटात 7 गुण असे एकूण 21 गुण दिले आहेत असे साखरे यांनी सांगितले.